मुंबई : रस्त्यावर अनधिकृतपणे गाडय़ा उभ्या करणाऱ्या वाहनचालकांकडून वसूल करण्यात येणारा १० हजार रुपयांपर्यंतचा दंड कमी करण्याचे पालिका प्रशासनाने निश्चित केले आहे. ज्या विभागात वाहन उभे असेल त्या विभागातील वाहनतळ दराच्या ४० पट दंड पालिका आकारणार आहे.

सार्वजनिक वाहनतळाच्या ५०० मीटरच्या आत गाडय़ा उभ्या करणाऱ्यांकडून पाच ते पंधरा हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्याचा निर्णय पालिकेने जुलै महिन्यात घेतला होता.  यात दुचाकीसाठी पाच हजार रुपये दंड तर चारचाकीसाठी दहा हजार रुपये दंड करण्यात आला होता. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी ही दंडाची रक्कम खूप जास्त होती. त्यामुळे या निर्णयाला विरोध होत होता. वाहनतळ प्राधिकरणाने दंडाच्या या रकमेबद्दल पालिकेला फटकारल्यानंतर पालिका प्रशासनाने नमते घेतले.  दंडाची रक्कम नक्की किती असावी याचा अभ्यास प्रशासनातर्फे सुरू होता.  पार्किंगच्या दराच्या ४० पट दंड आकारण्याचे नुकत्याच झालेल्या पार्किंग प्राधिकरणाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. दंडाच्या दर आकारणीमध्ये टोचन, मनुष्यबळ, साधन सामग्री यासाठी होणाऱ्या खर्चाचा समावेश आहे.

अनधिकृत पार्किंगचा दंड

सार्वजनिक वाहनतळापासून, सुविधा वाहनतळ तसेच बेस्ट आगार आणि बेस्ट स्थानकापासून ५०० मीटर त्रिज्येच्या आत असलेल्या रस्त्यावर अनधिकृतपणे गाडी उभी केल्यास दर असे असतील.

वाहनाचा प्रकार           पार्किंगचा दंड

तीन व चार चाकी        ४ हजार रुपये

दुचाकी                         १८०० रुपये

एम. के. रोड, एस. व्ही. रोड, एल. बी. एस. रोड, न्यू लिंक रोड हे मुंबईतील चार महत्त्वाचे रस्ते आहेत. त्यामुळे या चार रस्त्यांसाठी पार्किंगचा दंड  ८००० रुपये ठरवण्यात आला आहे. या रस्त्यांवरील सशुल्क वाहनतळांवर १२ तासांकरिता २०० रुपये पार्किंग दर आहेत. त्यामुळे त्याच्या ४० पट असा हा दंड आकारण्यात येणार आहे.

वाहनाचा प्रकार               पार्किंगचा दंड

तीन व चार चाकी             ८ हजार रुपये

दुचाकी                              ३४०० रुपये