वाहनतळासाठीचे राखीव भूखंड मेट्रो, एचपीसीएलला; वाहतूक कोंडीची भीती

 मुंबई : अवजड वाहनांमुळे त्रस्त असलेल्या चेंबूरमधील रहिवाशांना भविष्यात आणखी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. ही अवजड वाहने उभी करण्यासाठी राखीव असलेले भूखंड शासनाने मेट्रो आणि एचपीसीएल कंपनीच्या ताब्यात दिल्याने या परिसरात सध्या वाहनतळासाठी एकही जागा शिल्लक राहिलेली नाही. परिणामी सर्व वाहने रस्त्यावरच उभी राहणार असल्याने परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे.

चेंबूरच्या माहुल गाव, गव्हाण गाव, गडकरी खाण आणि वाशी नाका परिसरात अनेक तेल आणि गॅस कंपन्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी मालाची ने-आण करण्यासाठी रोज हजारोंच्या संख्येने अवजड वाहनांची वर्दळ असते. अनेक अवजड वाहने ही त्यांचा नंबर लागेपर्यंत रस्त्यावर उभी असतात. परिणामी या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते आहे. या अवजड वाहनांकरिता या परिसरात २३० आणि २८२ क्रमांकाचे भूखंड राखीव जागा ठेवण्यात आले होते. मात्र यापैकी एका भूखंडापैकी (२३०क्रमांक) ४० एकर जागा ही सध्या मेट्रो ३च्या यार्डासाठी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या (२८२ क्रमांक) जागेवर सध्या एचपीएसीएल कंपनीच्या नवीन प्रकल्पांचे काम सुरु आहे.

भूखंड क्रमांक २३० मधील जागा १९९१च्या विकास आराखडय़ामध्ये वाहनतळ म्हणून आरक्षित आहे. तर २०३४ च्या विकास आराखडय़ामध्ये देखील ही जागा वाहनतळासाठीच राखीव ठेवण्यात आली आहे. असे असताना शासनाने ही जागा मेट्रो ३च्या कामाकरिता दिल्याने भविष्यात या ठिकाणी वाहनतळ होणार की नाही, असा प्रश्न स्थानिक रहिवाशांना पडला आहे. अवजड वाहनांमुळे या परिसरातील रस्त्यांची देखील मोठी दुरवस्था आहे. तर दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अपघातांची संख्यादेखील वाढली आहे. शिवाय या अवजड वाहनांमुळे रस्त्यांवरील सर्व दिव्यांचे खांब कोसळल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

मेट्रो अथवा तेल कंपन्यांना विरोध नाही. मात्र शासनाने वाहतळासाठी राखीव असलेल्या जागेवर वाहतळच उभे करावे, अशी मागणी येथील रहिवाशांची आहे. यासाठी येथील स्थानिक नगरसेविका निधी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसह, जिल्हाधिकारी, वाहतूक पोलीस आणि येथील कंपन्यांना पत्रव्यवहार करून ही जागा पुन्हा वाहनतळासाठी देण्याची मागणी केली आहे. मात्र शासनाकडून याबाबत दुर्लक्ष  होत असल्याने येत्या ४ जुलैला परिसरातील रहिवाशांकडून याठिकाणी आंदोलन केले जाईल.

वाहनतळाची सोयच नाही

चेंबूरच्या माहुल गाव, गव्हाण गाव, गडकरी खाण आणि वाशी नाका परिसरात हिन्दुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, टाटा पॉवर, एजीस गॅस, इंडियन ऑईल आणि आरसीएफ या मोठय़ा कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांमधून रोज हजारो टँकर इतर राज्यात जात असतात. त्यामुळे या ठिकाणी रोज मोठय़ा प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र यातील एकाही कंपनीकडे स्वत:चे वाहनतळ नाही. परिणामी ही सर्व अवजड वाहने रस्त्यालगतच उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांची संख्यादेखील परिसरात वाढली आहे.

ही जागा आमच्या मालकीची आहे. मात्र मेट्रोसाठी झालेला करार मुख्य जिल्हाधिकारी कार्यालयातून झाला आहे. त्यामुळे आम्ही यावर काहीही बोलू शकत नाही.

– ज्ञानेश्वर खुटवड, उपजिल्हाधिकारी, चेंबूर