राज्य सरकारने हळूहळू टाळेबंदी शिथिल करण्याच्या दिशेने पावले टाकताच मुंबई महापालिकेने शहरातील उद्याने, मैदाने मुंबईकरांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही अटीसापेक्ष ही उद्याने, मैदाने सर्वासाठी खुली करण्यात येणार आहेत. तथापि, मुंबईमधील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स बंदच राहणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदी हळूहळू शिथिल करण्याची घोषणा केली. मुंबईमधील दुकाने अटीसापेक्ष खुली ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार रस्त्याच्या एकाबाजूची दुकाने एका तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी खुली ठेवण्याची मुभा मिळणार आहे.

त्याच धर्तीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी काही अटींचे पालन करून सकाळच्या वेळी व्यायामासाठी घराबाहेर पडण्यास परवानगी दिली आहे. इक्बाल सिंह चहल यांनी मंगळवारी परिपत्रक जारी करीत शारीरिक व्यायामासाठी समुद्रकिनारे, सार्वजनिक / खासगी मैदानांबरोबरच उद्यानेही खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र पहाटे ५ ते सायंकाळी ७ या काळात उद्याने खुली ठेवता येणार आहेत.

उद्यानांमध्ये गर्दी करू नये, काही व्यक्ती एकत्र येऊन कोणतेही कार्यक्रम करू नये, लहान मुलांसोबत मोठी व्यक्ती असावी, नागरिकांना घराजवळच्या उद्यानात वा मोकळ्या जागेत जाता येईल, मोकळ्या जागेत कटाक्षाने गर्दी टाळावी आदी अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच घरापासून दूरचा प्रवास करून उद्यान वा मोकळ्या जागेत जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.

मुंबईकरांची गरज लक्षात घेऊन प्लंबर, इलेक्ट्रिीशिअन, पेस्ट कंट्रोल करणारे आणि अन्य तंत्रज्ञांना मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून काम सुरू करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे.