विलेपार्ले परिसरात उभ्या केल्या जाणाऱ्या टुरिस्ट गाडय़ांविरोधात रहिवाशांनी आवाज उठवला आहे. या गाडय़ांमुळे अनेक समस्या निर्माण होत असून महिला व तरुणींच्या सुरक्षेचीही समस्या निर्माण झाली आहे. पोलीस, वाहतूक पोलीस, परिवहन अधिकारी व महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी झालेल्या संयुक्तपाहणी मोहिमेत या गाडय़ांविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन पार्लेकरांना देण्यात आले.
पर्यटक तसेच प्रवाशांची वाट पाहत थांबल्याने विमानतळावरील पार्किंगसाठी मोजावे लागणारे शुल्क टाळण्यासाठी अनेक गाडय़ा विलेपार्ले येथील गल्ल्यांत उभ्या राहतात. या गाडय़ांसोबत २०-२५ जणांचे टोळकेही उभे राहते. त्यातूनच छेडछाडीची प्रकरणे घडतात. त्यातच स्थानिकांना गाडी उभी करण्यासाठी जागा न देणे, रस्त्यात गाडी उभी करणे, या वाहनांसाठी पदपथावर खाणावळी सुरू होणे यामुळे त्रास होत असल्याची समस्या पार्लेकरांनी पोलिसांसमोर मांडली.
एकीकडे स्थानिकांच्या गाडीवर कारवाई होत असताना टुरिस्ट गाडय़ांकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे आमदार पराग अळवणी यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणले.