शैक्षणिक सहलीपुरते उरलेले निर्मितीस्थळ बंद होणार

भारतीय मुलांना बिस्किटाशी तोंडओळख करून देणाऱ्या ८७ वर्षे जुन्या ‘पारले जी’ या ख्यातकीर्त नाममुद्रेइतकेच प्रतिष्ठेचे असलेले तिचे मुंबईतील निर्मितीस्थळ कायमचे बंद होऊ घातले आहे. उपनगरीय रेल्वेने पार्ले स्थानक पार करताना हवेतील बिस्किटाच्या दरवळीमुळे प्रवाशांना ओळखीचे बनलेले हे ठिकाण. परंतु, गेल्या काही वर्षांत येथील उत्पादन प्रक्रिया बंद करण्यात आली. त्यामुळे शाळांच्या शैक्षणिक सहलीपुरत्या मर्यादित राहिलेल्या पारले-जीचे पाल्र्यातील अस्तित्वही राखण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चौहान कुटुंबीयांनी १९२९ साली विलेपार्ले स्थानकाला खेटून असलेल्या जागेत स्थापित केलेल्या या बिस्किटे व कँडी निर्मिती प्रकल्पातून दोन महिन्यांपूर्वी उत्पादन पूर्णपणे बंद केले आहे. कंपनीचा देश-विदेशातील वाढता पसारा पाहता, ही जागा निर्मिती प्रकल्पाऐवजी मुख्यालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे या प्रकल्पाचे प्रमुख व पारले प्रॉडक्ट्स लि.चे विपणन महासंचालक प्रवीण कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्याच वेळी ही जागा नफ्याच्या स्थावर मालमत्ता व्यवसायाच्या दृष्टीने विकसित केली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती कुलकर्णी यांनी केली.

सुमारे १० एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या विलेपार्ले (पूर्व) येथील हा बिस्किट निर्मिती प्रकल्प आसपास सर्वत्र निवासी संकुले आणि जुन्या पाल्रेकरांच्या बंगले आणि वाडय़ांनी वेढलेला आहे. या प्रकल्पात सुमारे ५०० कामगार कार्यरत होते. त्या सर्वानी गेल्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. चालू वर्षांतच जवळपास २५० कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तथापि कॉर्पोरेट मुख्यालय म्हणून काम सुरू होईल, तेव्हा यापेक्षा दुपटीने लोक येथे सेवेत असतील, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

पाल्र्याच्या या जुन्या निर्मिती प्रकल्पाचा अस्त हा मुंबईचा उद्योगनगरी व निर्मितीचे केंद्र म्हणून पूर्वलौकिक लोप पावत जाण्याचेही द्योतक आहे. निर्मिती उद्योगांसाठी हे शहर आता सोयीचे व उपयुक्त राहिले नसल्याचे, मध्य मुंबईतील गिरणगाव आणि उपनगरांतून एकामागोमाग एक बंद पडलेले बडे उद्योग दाखवून देत आहेत. अर्थात मुंबईतील जमिनीला आलेले सोन्याचे मोलही त्यास कारणीभूत आहेत. जुन्या उद्योगांच्या जागी आज टोलेजंग निवासी व वाणिज्य मनोरे उभे राहिले आहेत. पारले प्रॉडक्ट्सने आज तसा काही बेत नसल्याचे अधिकृतपणे म्हटले असले, तरी  हळूवार व क्रमश: हे परिवर्तन घडत जाते, असा अन्य उद्योगांचा अनुभव आहे. पाल्र्याच्या या प्रकल्पापासून काही अंतरावर असलेल्या पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा आज विकसित झालेली अनेक वाणिज्य संकुले, मॉल्स, आयटी पार्क्‍स हीच कथा सांगतात. उपनगरात जमिनीला चौरस फुटाला ३० ते ३५ हजार रुपयांचा मिळत असलेल्या मोलाचा मोह टाळता येईल काय, असा प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहे.

लहानगे सहलींनाही मुकणार!

लहानग्यांसाठी माहितीपर शैक्षणिक सहलीचे एक हक्काचे ठिकाण म्हणून पारलेच्या या प्रकल्पाचे आगळे स्थान होते. वय वर्षे १०-११ अथवा सहावीपर्यंतच्या मुलांना त्यांची आवडती बिस्किटे व स्वादिष्ट गोळ्या कसे बनतात याचे प्रात्यक्षिक येथे मिळत असे. ते यापुढे शक्य होणार नाही. परंतु पारले प्रॉडक्ट्सच्या अन्य निर्मिती प्रकल्पांत अशी सोय सुरूच असेल. अगदी मुंबईनजीक अंबरनाथ अथवा वडगांव, सातारा, जळगाव, नागपूर, नाशिक अशा अन्य ठिकाणी शालेय सहलींना पूर्वीसारखाच वाव कायम असेल, असे सांगण्यात आले.