पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांना ‘दिव्यांग’ हे नवीन नाव दिल्याने अपंगांचे प्रश्न सुटणार नसून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने आधी ठोस धोरण जाहीर करावे, असे स्पष्ट करत येत्या ४ एप्रिलला दिल्लीतल्या संसद भवनासमोर पन्नास हजार अपंग बांधवांसह ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशारा ‘प्रहार’ या संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. मुंबई येथे झालेल्या राज्यभरातील संघटक व पदाधिकारी यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. १९९५चा अपंग पुनर्वसन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वीस वर्षे वाट पाहिल्यानंतरही अपंगांना सर्वागीण विकासाकरिता केंद्राच्या काही जाचक अटींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शब्द बदलल्याने परिस्थिती बदलेल या भ्रमात न राहता ठोस काम करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. केंद्रीय स्तरावर अपंग आयोगाची स्थापना करणे, देश पातळीवर अपंगांची स्वतंत्र नोंद करण्यात यावी, अपंग व्यक्ती कायदा संमत करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदनही यावेळी करण्यात आले.