विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात उघड; कारवाईकडे लक्ष

ग्रामस्थ त्रास देत असल्याची व आपल्याला वाळीत टाकल्याची तक्रार घेऊन आलेला कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील रहिवासी परमानंद हेवाळेकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आपल्या ‘वर्षां’ निवासस्थानी बोलावून घेतले. तेथे हेवाळेकर यांनी श्री गणेशपूजन, आरती केली. मात्र, हेवाळेकर यांना गावाने वाळीत टाकलेले नसून, उलट महिलेच्या विनयभंगप्रकरणी पोलिसांना ते हवे आहेत, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

आपल्याला वाळीत टाकल्याचा दावा करीत हेवाळेकर यांनी गणपतीची मूर्ती घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयापुढे बुधवारी ठिय्या मांडला होता. हे कळल्यावर मुख्यमंत्र्यांनी हेवाळेकर यांची बुधवारी रात्री राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था केली. गुरुवारी सकाळी त्यांनी हेवाळेकर यांना आपल्या वर्षां या निवासस्थानी भेटीसाठी बोलाविले. तेथे हेवाळेकर याने गणेशपूजन व आरतीही केली. हेवाळेकरच्या तक्रारींवर योग्य कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले. मात्र, मुंबईत हा प्रकार सुरू असताना हेवाळेकर यांच्या संदर्भात धक्कादायक माहिती गुरुवारी उघड झाली.

‘हेवाळेकर ज्या गावचे आहेत त्या महादेवाचे केरवडे या गावात जात पंचायतच नाही. त्याला गावातून कोणीही बाहेर काढलेले नाही’, असे सरपंच पंढरीनाथ परब व पोलीस पाटील सतीश केरवडेकर यांनी सांगितले. ‘त्यांना वाळीत टाकण्याचा प्रश्नच येत नाही’, असे माजी पोलीस पाटील रमाकांत परब यांनीही नमूद केले. ‘महिलेचा विनयभंग केल्यामुळे सारे गाव हेवाळेकर यांच्या विरोधात होते. त्यांच्या विरोधात न्यायालयाने वॉरंटही काढले होते, असे पोलिसांनी सांगितले. आपल्या घरासमोरच राहणारी एक महिला घरात एकटीच असल्याचे पाहून हेवाळेकर तिच्या घरात शिरले. त्यानंतर त्या महिलेने हेवाळेकरविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानंतर ते पसार झाले. त्यानंतर या घरात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांसह परत कोणीही गावी आले नाही, असे सांगण्यात आले. ही माहिती उघड झाल्याने आता मुख्यमंत्री काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

दांपत्याचा मुक्काम उपायुक्तांकडे

मुंबई : गावाने वाळीत टाकल्याची तक्रार करणाऱ्या हेवाळेकर दाम्पत्याला गुरुवारी खुद्द मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला असला तरी बुधवारी रात्री आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी आलेल्या या दाम्पत्याला गणवेशातील माणुसकीचा प्रत्यय आला. गणेशमूर्ती घेऊन मंत्रालयापुढे ठिय्या मांडलेल्या या दाम्पत्याला मध्यरात्री परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. मनोज शर्मा यांनी थेट आपल्या घरातच आसरा दिला. बुधवारची रात्र दाम्पत्याची निवाऱ्याची सोय केल्यानंतर गुरुवारी सकाळी प्रसारमाध्यमांकडून हे वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावे पर्यंत त्यांचा सांभाळ उपायुक्तांनी केला.

हेवाळेकर दाम्पत्याने गणेशमूर्ती घेऊन बुधवारी रात्री थेट मंत्रालय गाठले. मंत्रालयाच्या परिसरात रात्री अकराच्या सुमारास ते दाखल झाले. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून न्याय हवा आहे, असे म्हणणाऱ्या या दाम्पत्याचे म्हणणे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ऐकले. त्यानंतर परिमंडळाचे उपायुक्त डॉ. मनोज शर्मा यांना दाम्पत्याविषयी समजले. त्यांनी मंत्रालयाकडे धाव घेऊन या दोघांची भेट घेतली. आपल्याला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे, असे हेरवाळकर यांनी सांगितल्यावर डॉ. शर्मा यांनी त्यांच्याकडून निवेदन घेऊन गुरुवारी सकाळी पुढील कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर, निवासाच्या सोयीविषयी त्यांची विचारणा केली असता, येथे आपल्या कुणीच ओळखीचे नसल्याचे त्यांनी सांगितले. उपायुक्त डॉ. शर्मा यांनी लगेचच हेवाळेकर यांना गणेशमूर्ती आपल्या गाडीत ठेवण्यात सांगितली आणि दाम्पत्याला घेऊन ते घरी गेले. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करुन उपायुक्तांनी आपल्याच घरी त्यांना आराम करण्यास सांगितले. गुरुवारी सकाळी मंत्रालयापुढे आलेल्या या दाम्पत्याविषयी मुख्यमंत्र्यांना कळल्यानंतर त्यांनी तातडीने त्यांना आपल्या घरी बोलावणे धाडले. दोघांनाही वर्षां बंगल्यावर पोहोचते केल्यानंतर उपायुक्तांचे त्यांनी आभार मानले.