लहानपणी भर दिवसा अंधार दाखवणाऱ्या पारसिक बोगद्याबाबत खूप कुतूहल होतं. गाडी बोगद्यात शिरल्यावर खिडकीत बसून ओरडण्याची मजा अनेकांनी घेतली असेल आणि घुमणारा आवाजही ऐकला असेल. पण आता पारसिक बोगद्याजवळ गाडी आल्यानंतर प्रवासी जीव मुठीत धरून बसतात. गाडीच्या दारात उभे असलेले बोगद्यातील घाण पाणी अंगावर पडू नये, म्हणून अंग आक्रसून घेतात. एका बोगद्याचा हा पारसिक ते पार ‘सीक’पर्यंतचा हा प्रवास..

ब्रिटिशांनी पहिली रेल्वे मुंबईत सुरू केली आणि देशाच्या विकासाची चाकं फिरू लागली, असं म्हणतात. या पहिल्या रेल्वेचं बांधकाम १८५१मध्ये सुरू झालं होतं आणि १८५३मध्ये मुंबई ते ठाणे हा ३४ किलोमीटरचा प्रवास रेल्वेने केलादेखील! त्यापुढे लोणावळा आणि इगतपुरी इथपर्यंतचा प्रवास थोडासा कष्टप्रद होता, पण तोदेखील त्या वेळी दहा वर्षांत पूर्ण झाला होता. याच्याच पुढील काळात १९१३मध्ये ठाण्याच्या पुढे मुंब्य्राचा डोंगर फोडून बोगदा बांधायचं काम सुरू झालं. पारसिकचा डोंगर नावाने ओळखल्या जाणाऱ्या या डोंगरात त्या वेळी १.२ किलोमीटर लांबीचा हा बोगदा बांधून तो रेल्वेच्या वाहतुकीसाठी १९१६मध्ये पूर्ण झाला. हाच तो पारसिकचा बोगदा!

यंदा या बोगद्याला शंभर र्वष पूर्ण होत आहेत. एकेकाळी आशिया खंडातील सर्वात लांब बोगद्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या या बोगद्याची खऱ्या अर्थाने शंभरी भरली आहे. रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने या बोगद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा बोगदा ठाणे आणि कल्याण या स्थानकांमधील अंतर किमान दहा मिनिटांनी कमी करतो. कळवा आणि मुंब्रा ही दोन्ही स्थानके टाळणारा हा बोगदा एकेकाळी निबीड जंगलातून वाट काढत जात होता. पण गेल्या शंभर वर्षांमध्ये त्यात बराच बदल झाला असून आता या बोगद्याच्या दोन्ही तोंडांशी प्रचंड लोकवस्ती झाली आहे. एवढंच नाही, तर बोगद्याच्या डोक्यावरही डोंगरउतारावर झोपडय़ांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत.

गेल्या वर्षी या बोगद्याची अवस्था तपासून त्याचे वृत्तांकन करण्याच्या निमित्ताने बोगद्यापर्यंत जाण्याचा योग आला. कळवा स्थानकात कल्याणच्या दिशेला उतरून पूर्वेकडे बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला एक पायवाट जाते. पावसाळी दिवसात या पायवाटेवरून चालणं अशक्य असतं. मानवी विष्ठा, प्रचंड चिखल, प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून रबरी चपलांपर्यंत आणि फाटक्या कपडय़ांपासून वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सपर्यंत वाट्टेल त्या गोष्टींचा कचरा आणि या सगळ्या रबरबाटात लोळत पडलेली डुकरं यांच्यातून वाट काढत चालत जाण्याचं दिव्य येथील रहिवासी कसे करतात, तेच जाणोत!

त्या वाटेने गेल्यानंतर भारतनगर नावाची वस्ती लागते. या वस्तीच्या सुरुवातीलाच रुळांपल्याड जाण्यासाठी, म्हणजेच रूळ ओलांडण्यासाठी एक वाट आहे. या वाटेवरून रूळांवर आल्यास १५०-२०० मीटर अंतरावर बोगदा चालू होतो. या बोगद्यासमोर उभं राहिल्यानंतर छाती दडपते. शंभर वर्षांपूर्वी असा बोगदा बांधणं हे अभियांत्रिकी क्षेत्रातलं आश्चर्यच म्हणायला हवं. उंच डोंगर, आजूबाजूला असलेला उतार आणि समोर गिळंकृत करणारा बोगदा! या बोगद्याच्या आत शिरल्यानंतर काही पावले चालल्यावर बोगद्याच्या बाजूच्या भिंतींमधून आणि छतांमधून झऱ्यांसारखं पाणी पडताना दिसतं. विशेष म्हणजे हे डोंगराच्या जमिनीत झिरपणारं पाणी नसून वरच्या वस्तीमधील शौचालये, बोगद्याच्या बरोबर वर असलेल्या शाळेची शौचालये यांच्या ड्रेनेजचं पाणी आहे. पण हा १५ ते २० मीटरचा भाग सोडल्यास बोगदा अजूनही सुस्थितीत आहे.

पण खरी मेख आहे ती बोगद्याच्या दोन्ही बाजूंना बोगद्यावर असलेल्या वस्तीची! या वस्तीमुळे पारसिक बोगद्याची अवस्था अत्यंत नाजूक झाली आहे. वास्तविक या बोगद्याच्या दोन्ही बाजूंना वर भराव टाकणे धोकादायक आहे. पण इथे सर्रास वस्त्या उभारण्यात आल्या आहेत. त्यात एक-दोन मजल्यांच्या घरांचा नाही, तर चांगल्या चार-चार मजल्यांच्या इमारतींचाही समावेश आहे. या वस्त्यांमधून बोगद्यावर, बोगद्याच्या दोन्ही बाजूंना प्रचंड प्रमाणात कचरा टाकला जातो. गाडी बोगद्यात शिरताना किंवा बोगद्याबाहेर पडताना वेगात असते आणि त्या वेगाच्या झोताने हा कचरा उडतो आणि रुळांवर येतो. हे अर्थातच रेल्वेच्या परिचालनासाठी प्रचंड घातक आहे.

दोन महिन्यांपूर्वी मुंब्य्राच्या टोकाकडे बोगद्यावर रेल्वेने उभारलेल्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने हा भाग थेट रुळांवर पडला नाही. पण त्या निमित्ताने पुन्हा पारसिक बोगद्याचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर रेल्वे आणि ठाणे महानगरपालिकेने तातडीने येथे संरक्षक भिंत उभारण्याबाबत, बोगद्यावरील बेकायदेशीर बांधकामे आणि बोगद्याभोवती पडलेला कचरा हटवण्याबाबत निर्णय घेतले. पण येथील रहिवाशांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आणि प्रकरण थंडावले.

पारसिक बोगद्याच्या अवस्थेबाबत आणि त्यावर शक्य असलेल्या उपायांबाबत रेल्वेने नागपूरच्या केंद्रीय खनिकर्म संशोधन संस्थेला सर्वेक्षण करण्यास सांगितले होते. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार बोगद्यात होणारी पाण्याची गळती थांबवणे आवश्यक आहे. त्यासाठीचे उपाय करण्यासाठी रेल्वेला पारसिक बोगदा प्रदीर्घ काळ बंद ठेवावा लागेल. हे रेल्वेला परवडणारे नसल्याने आता हे पाणी थेट बोगद्यात पडू नये, यासाठीचे उपाय रेल्वेने अवलंबले आहेत.

वास्तविक या प्रकरणात एकटय़ा रेल्वेने कितीही उपाय केले, तरी ते अपुरे ठरणार आहेत. या बोगद्यावरील बांधकामांमुळे असलेला धोका टाळण्यासाठी ठाणे महापालिका आणि रेल्वे यांनी एकत्रितपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी या बोगद्याच्या आसपास असलेल्या वस्तीमध्ये समुपदेशन करण्यापासून कचरा टाकल्यास कठोर शिक्षा करण्यापर्यंत अनेक पावले उचलावी लागणार आहेत. मंगळवारी मुंब्रा बायपास भागात दरड कोसळल्याने या बोगद्यावरील टांगती तलवार कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. जून महिन्यात घडलेल्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण अनधिकृत बांधकामांच्या ओझ्यामुळे पार ‘सीक’ झालेल्या या बोगद्याजवळ दुसऱ्यांदा असा अपघात होणार नाहीच, असे गृहीत धरून चालणे योग्य नाही.

tohan.tillu@expressindia.com
@rohantillu