News Flash

हजारी कारंज्या’मुळे पारसिक बोगद्याला धोका?

डोंबिवली-ठाणे या स्थानकांदरम्यान जलद मार्गावर असलेला पारसिकचा बोगदा नवीन प्रवाशांच्या कुतुहलाचा विषय असतो

झिरपणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाढ
पावसाने दडी मारल्यानंतर आता उन्हाच्या तीव्र झळांनी भाजून निघणारे लोकल प्रवासी दरवाज्यात उभे राहून ठाण्याच्या पुढे गाडी पारसिक बोगद्यात शिरताना उडणारे पाण्याचे शिंतोडे अंगावर घेत समाधान मानतात. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत पारसिक बोगद्यात उडणाऱ्या पाण्याच्या शिंतोडय़ांचे प्रमाण वाढले असून बोगद्याच्या अगदी ३०-४० मीटर आतपर्यंत आता थेट पाण्याची कारंजीच सुरू झाली आहेत. ही कारंजी बोगद्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असून मध्य रेल्वेने याची दखल घेत बोगद्याच्या छताचे आणि डोंगराच्या भूगर्भाचे सर्वेक्षण करण्याचे काम केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थेकडे सोपवले आहे. या संस्थेच्या म्हणण्यानुसार बोगद्यात पाणी झिरपणे हे अत्यंत स्वाभाविक असते. मात्र पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढल्यास सुरक्षेचे उपाय करणे आवश्यक आहे.
डोंबिवली-ठाणे या स्थानकांदरम्यान जलद मार्गावर असलेला पारसिकचा बोगदा नवीन प्रवाशांच्या कुतुहलाचा विषय असतो. डोंबिवलीच्या बाजूने या बोगद्यात शिरल्यावर कळव्याजवळ बाहेर पडताना दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या तोंडावर हमखास पाण्याचा एक हबका बसतो. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत पारसिक बोगद्यात पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला कळव्याच्या बाजूला गाडी बाहेर पडत असताना बोगद्याच्या तोंडाशीच पाणी पडत होते. मात्र आता गाडी बोगद्यात ३०-४० मीटर असतानाच पाणी अंगावर येते.
या बोगद्यात जाऊन प्रत्यक्ष पाहिले असता हे पाणी केवळ झिरपत नसून बोगद्याच्या छतावर आणि बाजूच्या भिंतींमध्ये दहा-बारा नळ बसवल्यासारखे धबाधबा पाणी पडत असल्याचे आढळून येते. मध्य रेल्वेनेही पारसिक बोगद्यातील या ‘हजारी कारंज्या’ची दखल घेतली आहे. बोगद्यातून पाणी झिरपणे, यात धोकादायक असे काही नाही. मात्र तरीही आम्ही या प्रकरणी सर्वेक्षण व अभ्यास करण्यासाठी नागपूरच्या केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थेला पाचारण केल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता (दक्षिण विभाग) आर. के. यादव यांनी सांगितले.

बोगद्यात पाणी झिरपण्याची बाब लक्षात आल्यानंतर जलस्रोत काय, तो कसा वळवता येईल, याचा आढावा घेतला जात आहे. झिरपण्याची व्याप्ती आणि प्रमाण अधिक असल्यास भविष्यात धोका उत्पन्न होऊ शकतो. तो टाळण्यासाठी काही सुरक्षात्मक उपायही हाती घेण्यात येतील. त्याची चाचपणी सध्या केली जात आहे.
– डॉ. ए. के. सोनी, प्रमुख केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था (नागपूर विभाग )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 10:56 am

Web Title: parsik tunnel in dangerous situation
Next Stories
1 कॉल ड्रॉपच्या पैशांची कंपनीकडूनच वसुली
2 पावसाने दडी मारल्याने विजेची मागणी वाढली
3 पाणीकपात ३ ० टक्क्यांवर?
Just Now!
X