14 October 2019

News Flash

ग्रॅण्ट रोड येथून ‘पार्टी ड्रग’ हस्तगत

मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ग्रॅण्ट रोड परिसरातून सलीम तलवार (५६) या व्यक्तीला अटक केली.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ग्रॅण्ट रोड परिसरातून सलीम तलवार (५६) या व्यक्तीला अटक केली. सलीमकडून पथकाने १४ ग्रॅम एमडीएमए हा अमली पदार्थ हस्तगत केला. एमडीएमएचा वापर विशेषत: रेव्ह पाटर्य़ामध्ये होतो. या अमली पदार्थाची नशा उच्चभ्रू वर्गात लोकप्रिय आहे.

पथकाच्या आझाद मैदान कक्षातील साहाय्यक निरीक्षक सचिन कदम आणि प्रशांत मोरे सोमवारी रात्री गस्तीवर असताना पठ्ठे बापूराव मार्गावर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळली. कदम, मोरे यांनी त्याला हटकले. असंबंध बडबड केल्याने त्या व्यक्तीवरील संशय बळावला आणि पोलीस पथकाने त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्या ताब्यातून एक पुडी आढळली. त्यात १४ ग्रॅम एमडीएमए अमली पदार्थ होता. चौकशीत या व्यक्तीचे नाव सलीम तलवार आहे, त्याच्याविरोधात अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पथकाला मिळाली. एलएसडीप्रमाणे एमडीएमए हा अमली पदार्थ विश्वासातल्या ग्राहकाने मागणी केल्यास परदेशातून मागवला जातो.

कोकेन, चरस किंवा एमडीच्या तुलनेत एमडीएमएची नशा करणारा वर्ग अत्यंत किरकोळ असला तरी तो श्रीमंत घरातील किंवा उच्चभ्रू वलयातील आहे. साधारण १२ तास नशा टिकवून ठेवणारा हा पदार्थ रेव्ह पाटर्य़ामध्ये हमखास आढळतो. त्यामुळे सलीमकडे संभाव्य रेव्ह पार्टीच्या दृष्टिकोनातून चौकशी, तपास सुरू असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.

First Published on September 5, 2018 1:01 am

Web Title: party drug recover from grant road