सोमवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड रेल्वे स्थानकादरम्यान एका गुंडाने चाकूच्या धाकाने एका प्रवाशाला लुटले. संतापजनक बाब म्हणजे पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्याऐवजी या प्रवाशाचीच उलट तपासणी घेतली.
विनय परब (५२) हे भाईदास नाटय़गृहाचे व्यवस्थापक रोज रात्री पाऊणच्या सुमारास विलेपार्ले येथून लोकल पकडून चर्नी रोडला घरी जातात. मंगळवारी मध्यरात्री त्यांनी नेहमीप्रमाणे १२ वाजून ४१ मिनिटांची विलेपार्ले येथून चर्चगेटला जाणारी गाडी पकडली. ते प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करीत होते. महालक्ष्मी स्थानकात एक इसम त्यांच्या डब्यात शिरला. त्याने परब यांच्या गळ्याला चाकू लावून धमकावले आणि परब यांच्याकडील आयफोन, १ तोळा सोन्याची अंगठी आणि ८ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली.
यावेळी डब्यामध्ये अन्य कुणी प्रवासी नव्हते. भेदरलेल्या परब यांना त्याने खाली बसवून ठेवले. ग्रँट रोड स्थानक आल्यावर तो गुंड आरामात निघून गेला.
पोलिसांचा बेजबाबदारपणा
चर्नी रोड स्थानकात उतरून परब यांनी रेल्वे स्थानकातील हवालदाराच्या मदतीने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक पोलीस ठाणे गाठले. परंतु तेथील अधिकाऱ्याने त्या हवालदारालाच दमात घेत यांना इथे का आणले, असा सवाल केल्याचा आरोप परब यांनी केला. तेथे रात्रपाळीस असलेल्या अधिकाऱ्याने एवढय़ा रात्री का प्रवास करता, मोबाईलचे बिल आहे का, अंगठी तुमचीच का, बिल दाखवा, नोटा किती होत्या असे प्रश्न विचारत उलट तपासणी केल्याचा आरोप परब यांनी केला.
विशेष म्हणजे आम्ही तक्रार घेतो पण चाकूचा धाक दाखवून लुटले असा उल्लेख तक्रारीत करू नका, असा दबावही तो अधिकारी आणत असल्याचे परब यांचे म्हणणे आहे. लुटीच्या घटनेने आधीच भेदरेल्या परब यांना या पोलिसी खाक्याने मोठा धक्का बसला. पोलिसांनी अवघ्या ४८ हजारांची चोरी झाल्याची तक्रार घेतली आहे.
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. तपासासाठी मोबाईलचे बिल आवश्यक असते. त्यामुळे त्याची मागणी केल्याचे ते म्हणाले. चाकूचा उल्लेख तक्रारीत केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोबाईल आता सेकंडहॅंण्ड झाला त्यामुळे त्याची किंमत कमी झाली आहे असेही स्पष्टीकरण त्यांनी केले. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी परब यांना थांबायला सांगितले होते, असेही त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, कुठल्याही सीसीटीव्हीत तो संशयित आरोपी आढळलेला नाही. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याचे रेखाचित्र तयार करीत आहेत.