नव्या वेळापत्रकात मंगळवारपासून १५ डब्यांच्या लोकल्स केवळ कल्याण स्थानकापर्यंत सोडून रेल्वे प्रशासनाने घोर निराशा केल्याची कल्याणपल्याडच्या प्रवाशांची भावना आहे. सुरुवातीला गर्दीच्या वेळेत १५ डब्यांची किमान एक फेरी कसारा तसेच कर्जत मार्गावर सोडावी, अशी प्रवासी संघटनांची मागणी होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. उलट त्यांना कल्याण शटलचे गाजर दाखविण्यात आले आहे.
मुंबई-ठाणे परिसरातील घरांच्या वाढत्या किमतींमुळे कर्जत मार्गावरील अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, नेरळ तसेच कसारा मार्गावरील टिटवाळा, आटगांव, आसनगांव आदी शहरांची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. मात्र नव्या वेळापत्रकात या वास्तवाची अजिबात दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष आहे.
आमदार करणार लोकल प्रवास
बदलापूरचे आमदार किसन कथोरे यांनी रेल्वे प्रशासनाकडे कल्याणपल्याड राहणाऱ्या लाखो उपनगरी प्रवाशांचे प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे व्यवस्थापकांना पत्र लिहून त्यांना रेल्वे मार्गातील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची विनंती केली आहे.
प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आता दर मंगळवारी कथोरे बदलापूरहून लोकल प्रवास करणार आहेत.  दर आठवडय़ास निरनिराळ्या डब्यांमधून प्रवास करून ते प्रवाशांशी संवाद साधणार आहेत. १६ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेपासून त्यांच्या या मोहिमेची सुरुवात होणार आहे.