मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर तोतया तिकीट तपासनीसांमुळे प्रवाशांची लूट होत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प हाती घेतला आहे. तिकीट तपासनीसांना (टीसी) क्यूआर कोड असलेले ओळखपत्र देण्यात आले असून प्रवासी मोबाइलवर हा कोड स्कॅन करून तिकीट तपासनीस तोतया आहे की रेल्वेचा कर्मचारी हे ओळखू शकतात.

गेल्या काही वर्षांत पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांत तोतया तिकीट तपासनीसांचाही सुळसुळाट झाला आहे. त्यांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प ठाणे स्थानकात राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये तिकीट तपासनीसांना क्यूआर कोड असलेले ओळखपत्र देण्यात आले आहे.

हा क्यूआर कोड रेल्वेच्या सव्‍‌र्हरशी जोडण्यात आला आहे. त्यात तिकीट तपासनीसांची सर्व माहिती उपलब्ध आहे. तिकीट तपासनीसांच्या ओळखपत्रावरील क्यूआर कोड प्रवासी आपल्या मोबाइलवरून स्कॅन करू शकतील. स्कॅन करताच प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवर तिकीट तपासनीसाची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तिकीट तपासनीस रेल्वेचा कर्मचारी आहे की तोतया हे तात्काळ समजण्यास मदत मिळणार आहे. ठाणे स्थानकात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच त्याची अन्यत्र अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

यापूर्वी प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनेक तोतया तिकीट तपासनीस पकडले गेले आहेत. जून २०१६ मध्ये ठाणे स्थानकातच तिकीट तपासनीस असल्याची बतावणी करून व ओळखपत्र दाखवून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर तोतया तपासनीसांचा प्रश्न गांभीर्याने घेण्यात आला.

* डिसेंबर २०१८ मध्ये मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकात दोन विद्यार्थिनींनी एका तोतया महिला तिकीट तपासनीसाला पोलिसांच्या हवाली केले होते. जानेवारी २०१९ मध्येही एका तोतया  तिकीट तपासनीसाला पकडण्यात आले होते.