करोना तपासणी आणि रांगांमुळे वेळेचा अपव्यय

मुंबई : एखाद्या राज्यातून अथवा देशातून दुसऱ्या देशात जलदगतीने जाण्यासाठी निवडला जाणारा आरामदायी हवाई मार्ग आता प्रवाशांसाठी घाम फोडणारा ठरत आहे. करोनाच्या नव्या विषाणूला अटकाव करण्यासाठी मुंबई विमानतळावर सुरू असलेली चाचणी आणि त्यासाठी लागणाऱ्या रांगा यांमुळे प्रवाशांचे तीन ते चार तास विमानतळावरच व्यतित होत आहेत. एवढेच नव्हे, तर विमानाच्या उड्डाणवेळेच्या तीन तास आधी प्रवाशांना विमानतळावर हजर राहावे लागत आहे. परिणामी विमानतळावर संपूर्णपणे गोंधळाची स्थिती आहे.

सध्या मुंबई विमानतळावर राज्याच्या बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची फक्त तापमान तपासणी होते. विमानतळाच्या आत प्रवेश करण्याआधीच प्रवाशांची तपासणी करतानाच आरोग्य सेतू अ‍ॅपही आवर्जून तपासले जाते. त्यानंतर आत प्रवेश करताच प्रवाशांना नेहमीप्रमाणे अन्य प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. मात्र करोनाच्या धास्तीने मुंबई विमानतळावरील परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. प्रवाशांनी विमान उड्डाणाच्या एक ते दीड तास आधी पोहोचणे अपेक्षित असते. परंतु प्रवासी दोन ते तीन तास आधीच पोहोचत आहे. त्यामुळे विमानतळाच्या आत प्रवेश करताना होणाऱ्या सुरक्षा तपासणीसाठी रांगा लागतात. यातून सुटका होत नाही, तोपर्यंत आत सामानाच्या तपासणीसाठीही भल्या मोठय़ा रांगेला सामोरे जावे लागते. परिणामी एक ते दीड तास आधी विमान प्रवासासाठी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आलेल्या प्रवाशाला मात्र अन्य प्रवाशांच्या ‘हातघाईचा’ फटका बसतो. त्यांनाही या रांगेचा सामना करावा लागत आहे. मुंबई ते हैदराबाद या सायंकाळी चारच्या विमानासाठी मनोज दुबे यांनी अडीच तास आधीच रांग लावून विमानतळावर प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. सध्या करोनाचा काळ असून काही प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेळ जातो. त्यामुळे विलंब होऊ नये यासाठी आधीच प्रवेश करत असल्याचे सांगितले. सकाळी ९.१० वाजता हैदराबादला जाणाऱ्याही एका प्रवाशानेही नेहमीप्रमाणे दीड तास आधी प्रवेशासाठी रांग लावली. परंतु सकाळी ११ वाजता देशांतर्गत असलेल्या अन्य विमान सेवांसाठीही प्रवाशांनी दोन ते तीन तासआधीच रांग लावल्याने अन्य प्रवाशांचे हाल झाल्याचे एका प्रवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे विमानतळावरील प्रवास सुरू करण्यापूर्वीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी बराच वेळ लागत होता.

आरोग्य सेतू अ‍ॅपचा ‘स्क्रीनशॉट’

’ विमानतळाच्या आत प्रवेश मिळवण्यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅप प्रवाशांना बंधनकारक केले आहे. परंतु अ‍ॅप सुरू होण्यापासून त्यातील प्रक्रिया पार होईपर्यंत लागणारा विलंब आणि अ‍ॅपमध्येही करोना संक्रमण झालेला रुग्ण दाखवण्याची सुविधा असल्याने प्रवाशांनी त्याचीही धास्ती घेतली आहे. काही प्रवासी हे आरोग्य सेतू अ‍ॅपच्या आतील प्रक्रियेचा स्क्रीनशॉट घेऊन तोच प्रवेशद्वाराजवळ दाखवून आत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी पकडले जात असून प्रवेशद्वाराजवळील विमानतळ कर्मचाऱ्यांकडून त्यांना ते अ‍ॅप व्यवस्थित डाऊनलोड करून सर्व प्रक्रिया पार पाडण्यासही भाग पाडत आहेत.

’ स्मार्टफोन नाही, असे सांगणाऱ्या प्रवाशांना जवळच असलेल्या काऊंटरवरुन एक अर्ज घेण्यास सांगतात व त्यात प्रवाशाचे नाव, त्याचे पीएनआर नंबर, विमान क्रमांक, उड्डाण व आगमन ठिकाण, तारीख अशी सर्व माहिती भरून घेत आहेत.  दिवसाला असे २०० ते ३०० फॉर्म प्रवासी घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.