घाटकोपर व अंधेरी रेल्वे स्थानके ही मेट्रोशी जोडल्यानंतर या दोन्ही स्थानकांतून गर्दीच्या वेळी प्रवास करणे जिकिरीचे होते. ही कोंडी दूर करण्यासाठी अंधेरी आणि घाटकोपर स्थानकांची पाहणी करून त्याचा अहवाल एक महिन्यात सादर करा, असे आदेश रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले. त्यामुळे या स्थानकांत होणारी कोंडी दूर होऊन प्रवाशांना सुखकर प्रवास करता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात विविध सुविधांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी गोयल बोलत होते.

मध्य रेल्वेवरील घाटकोपर आणि पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत. रहिवासी संकुल, सरकारी व खासगी कार्यालये येथे मोठय़ा प्रमाणात असल्याने या दोन्ही स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. तशातच मेट्रोमुळे दोन्ही स्थानकांतील गर्दी अधिकच वाढली. अपुरे पडत असलेले फलाट, तिकीट खिडक्या, एटीव्हीएम, सरकते जिने, काही फलाटांवर असलेल्या खाद्यपदार्थ स्टॉल्समुळे प्रवाशांना ये-जा करण्यास होणारी अडचण पाहता सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी खासदार मनोज कोटक यांनी केली होती. सीएसएमटी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी रेल्वेमंत्री गोयल यांनी मध्य व पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता यांना अंधेरी व घाटकोपर स्थानकांची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. ३० दिवसांत अहवाल सादर करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. त्यानंतर मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक एस.जैन यांनी अधिकाऱ्यांसह घाटकोपर स्थानकाची पाहणी केली. रेल्वे व मेट्रोकडून येत्या सात दिवसांत प्राथमिक उपाययोजनाही केल्या जाणार आहेत.