News Flash

जिवावर उदार होऊन रुळांवर!

प्रवाशांनी रूळ ओलांडू नये यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेबरोबरच मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी)अनेक उपाययोजना राबवल्या.

(संग्रहित छायाचित्र)

दीड वर्षांत २,५०० जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या घाईपुढे २०५ कोटींचे उपायही निष्प्रभ

जनजागृतीपासून संरक्षक भिंती उभारण्यापर्यंत आणि पादचारी पूल बांधण्यापासून फलाटांची उंची वाढवण्यापर्यंत अनेक प्रयत्न करूनही  वेळेची बचत करण्यासाठी रूळ ओलांडण्याचा मोह मुंबईकर प्रवाशांना सुटताना दिसत नाही. त्यामुळे जानेवारी २०१७ ते जुलै २०१८ या कालावधीत लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या धडकेत तब्बल दोन हजार ५७९ प्रवाशांनी प्राण गमावले आहेत.

प्रवाशांनी रूळ ओलांडू नये यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेबरोबरच मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी)अनेक उपाययोजना राबवल्या. ‘एमआरव्हीसी’ने तर एमयूटीपी-२ अंतर्गत स्थानकातील रूळ ओलांडण्याचे प्रमाण रोखण्यासाठी २०५ कोटी रुपये खर्च केले. मात्र  या अपघातांत घट झालेली नाही. प्रत्येक स्थानकावर उद्घोषणांमधून रूळ ओलांडण्याचा धोका अधोरेखित केला जातो. रुळांलगत संरक्षक भिंत बांधणे, दोन रुळांदरम्यान जाळी बसवणे, पादचारी पूल, सरकते जिने यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढवणे अशा उपायांवर ‘एमआरव्हीसी’ने एप्रिल २०१४ ते मार्च २०१७ या कालावधीत २०५ कोटी रुपये खर्च केले. मात्र, तरीही मुंबई उपनगरी रेल्वेच्या हद्दीत दररोज सरासरी चार जणांचा रूळ ओलांडताना मृत्यू होत आहे.

ठाणे ते दिवा स्थानकाची हद्द असलेल्या ठाणे लोहमार्ग पोलीसअंर्तगत २०१७ पासून ३४२, कोपर ते कल्याण स्थानकाची हद्द असलेल्या कल्याण स्थानकात ३३६ तसेच गोरेगाव ते दहिसर हद्द असलेल्या बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातही २७९ जणांचा रूळ ओलांडताना झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यानंतरही कुर्ला, डोंबिवली, वसई पोलीस ठाण्यातही या अपघाताची सर्वाधिक नोंद आहे.

संरक्षक भिंतींना भगदाड

पश्चिम व मध्य रेल्वेकडून वारंवार संरक्षक भिंत, दोन रुळांमध्ये जाळी बसवण्यात येते, तरीही काही वेळा रुळांजवळील झोपडय़ांमधील रहिवाशांकडूनही संरक्षक भिंतींना भगदाड पाडून शॉर्टकटचा मार्ग केला जातो. मध्य रेल्वेकडून स्थानकादरम्यान टप्प्याटप्यात असलेल्या ४१ किलोमीटरच्या संरक्षक भिंतीचे आणि पश्चिम रेल्वेकडून २२ किलोमीटरच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम केले जाईल. त्यासाठी एमआरव्हीसीकडून निधी दिला आहे. दोन स्थानकांदरम्यान उपाययोजना करण्यासाठी ५२१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

एमयूटीपी-२ अंर्तगत स्थानकातील रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी पादचारी पूल, सरकते जिने उभारतानाच फलाटांची लांबी वाढवणे, स्थानकाशेजारीच पादचारी मार्गिका उपलब्ध करून देण्यासह अन्य उपाययोजना करण्यात आल्या. दोन स्थानकांतील रूळ ओलांडतानाही अपघात रोखण्यासाठी एमयूटीपी-३ अंतर्गत उपाययोजना केल्या जात आहेत. अशी ३६ ठिकाणे निदर्शनास आली आहेत. संरक्षक भिंत उभारणीसाठी मध्य व पश्चिम रेल्वेलाही निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

– रवी शंकर खुराना, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 4:41 am

Web Title: passengers lost their lives in the run of local and mail express trains
Next Stories
1 किरकोळ बाजारात भाजी महागच
2 राम कदम यांच्या वक्तव्याचे पालिकेत पडसाद
3 डेंग्यू, हिवताप रुग्णांमध्ये घट!
Just Now!
X