मुंबई : चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकदरम्यान धावणारी मोनो रेल्वेसेवा जवळपास सात महिन्यांनंतर रविवारपासून सुरू झाली. र्निजतुकीकरण, तापमान तपासणीसाठी मोठय़ा प्रमाणात कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे स्थानके आणि रेल्वेगाडीत सकाळच्या वेळी शुकशुकाटच दिसून आला.

उपनगरी रेल्वेसेवा (लोकल) केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असल्याने मोनोसेवेचा उपयोग पहिल्या दिवशी काही प्रवाशांनी केला. तर दोन जणांनी केवळ भ्रमंतीसाठी हे माध्यम निवडले. अँटॉप हिल येथून रोज बसने दादर आणि मग टॅक्सीने नोकरीसाठी लोअर परळ गाठावे लागायचे. येऊन जाऊन शे-दोनशे रुपये खर्च व्हायचे. मोनो सुरू झाल्यामुळे हा प्रवास चाळीस रुपयांत होणार असल्याने,  प्रवासी प्रीती सिंग यांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वी त्या उपनगरी रेल्वेने प्रवास करायच्या. तर लोकल बंद असून, बससेवा पुरेशी नसल्याने वाशी नाका येथील विशाल कांबळे यांनी सोमवारी मोनो सुविधेचा उपयोग के ला.

मोनोसेवेवर रेल्वेगाडय़ांची कमतरता असून, सध्या केवळ पाचच गाडय़ा कार्यरत आहेत. त्यापैकी एकावेळी दोन गाडय़ा धावणार असून, एक गाडी आयत्या वेळी लगेचच कार्यरत होण्यासाठी तयारीत असेल. करोनापूर्व काळात एका फेरीत ५८२ प्रवासी प्रवास करू  शकायचे, त्याऐवजी आता केवळ १२० प्रवाशांना परवानगी असेल.

मोनो स्थानकात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी केवळ एकच मार्ग खुला ठेवण्यात आला असून, तेथेच तापमान तपासणी आणि हातांच्या र्निजतुकीकरणाची सुविधा आहे. सर्व स्थानकांत, तसेच रेल्वेगाडीत प्रवाशांचा स्पर्श होईल अशा ठिकाणी सातत्याने र्निजतुकीकरण करण्यासाठी कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. तसेच रेल्वेगाडीतदेखील गर्दी नियंत्रण तसेच हवा खेळती राहण्याकरिता झडप उघडझाक करण्यासाठी एक कर्मचारी कार्यरत आहे.

मुळात आडबाजूला आणि मर्यादित व्यावसायिक केंद्राना जोडणाऱ्या मोनोवर करोनापूर्व काळात दिवसाला सुमारे १२ हजार प्रवासी करत होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये या मार्गिकेचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा विस्तार करण्यात आला. तेव्हा महिन्याला तीस लाख प्रवाशांचे उद्दिष्ट होते, पण वर्षभरात त्याच्या सरासरी एक दशांश प्रवाशांनीच याचा लाभ घेतला.

प्रवास करताना

* मास्क आणि तापमान तपासणीनंतरच प्रवेश

* प्लास्टिक टोकन बंद, कागदी तिकिटाचा वापर

* स्पर्शविरहित क्यूआर कोड तिकीट यंत्रणा बुधवारपासून उपलब्ध

* ४८ प्रवासी बसून, ७२ प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास मुभा

* चेंबूर आणि संत गाडगे महाराज चौक स्थानकात तीन मिनिटांचा थांबा

*   सकाळी ७.०३ ते ११.२४ आणि दुपारी ४.०३ ते रात्री ९.२४ या वेळेत कार्यरत. प्रतिसादानुसार वेळ वाढवली जाईल