सामान्य फेऱ्यांवर गदा आणणाऱ्या वातानुकूलित लोकलला विरोध; ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवासी हैराण

मुंबई : ठाणे ते वाशी-पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावर सुरू करण्यात आलेली ट्रान्सहार्बर लोकल या मार्गावरील प्रवाशांसाठी गैरसोयीची अधिक ठरत आहे. या लोकलचे अवाजवी भाडे, त्या तुलनेत सुविधांची कमतरता आणि या लोकलच्या फेऱ्यांसाठी सर्वसाधारण लोकलच्या फेऱ्यांतील कपात या कारणांमुळे आठवडाभरातच ट्रान्सहार्बरचे प्रवासी एसी लोकलबद्दल नाराजीचा सूर आळवू लागले आहेत.

ट्रान्सहार्बर मार्गावर ३१ जानेवारीपासून सुरू झालेल्या वातानुकूलित लोकलसाठी सामान्य लोकलच्या १६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्घाटनाच्या दिवसापासूनच प्रवासी तिच्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. या लोकलचे तिकीटदर अवाच्या सवा असल्याने त्यातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही कमी आहे. सोमवारी (दि. ३ फेब्रु.) या लोकलला सकाळच्या आठही फेऱ्यांमध्ये प्रत्येकी ५० प्रवासीही नव्हते, असे सांगण्यात येत आहे. लोकलचे स्वयंचलित दरवाजांच्या उघडझापमुळे ही लोकल प्रत्येक स्थानकात जास्त वेळ थांबवावी लागत आहे. परिणामी, या विलंबाचा परिणाम सामान्य लोकलच्या वेळापत्रकावरही दिसून येत आहे.

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या उपाध्यक्ष लता अरगडे यांनी वातानुकूलित लोकल चालवण्यासाठी कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र या लोकलगाडय़ांसाठी थोडे योग्य नियोजन हवे असल्याचे त्या म्हणाल्या. सोळा फेऱ्यांऐवजी सुरुवातीला काही मोजक्याच फे ऱ्या चालवून प्रवाशांचा प्रतिसाद पाहणे गरजेचे होते. सामान्य फेऱ्या रद्दच झाल्यामुळे प्रवासी नाराज झाले आहेत. वातानुकूलित लोकलचे भाडे प्रत्येकालाच परवडणारे नाही. मुंबईत धावणाऱ्या मेट्रोचे भाडे आवाक्यात आहे. रेल्वेनेही त्याप्रमाणे विचार करणे गरजेचे असून त्यासाठी प्रवासी संघटनेकडून पाठपुरावा करू, असे त्या म्हणाल्या.

उपनगरीय रेल्वे एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनीही सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करणे योग्य नसल्याचे सांगितले. वातानुकूलित लोकलचे भाडेही जादा असून ते परवडणारे नाही. प्रवाशांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी मध्य रेल्वेने प्रयत्न केले पाहिजे. वाचानुकूलित लोकलचे भाडे अधिक असल्यामुळे प्रवासी त्याकडे फिरकणार नाही. उलट रद्द केलेल्या सामान्य लोकल फे ऱ्यांमुळे अन्य फे ऱ्यांवर ताण पडत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वे मार्गावरील वातानुकूलित लोकललाही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नाही. सामान्य लोकलच्या १२ फेऱ्या रद्द करून चालवण्यात येणाऱ्या वातानुकूलित लोकल गाडीच्या अवघ्या चार फे ऱ्यांनाच प्रतिसाद मिळतो. एका फेरीतून केवळ दीड हजार प्रवासीच प्रवास करत आहेत.

पश्चिम रेल्वेवर अर्ध वातानुकूलित लोकल गाडीचा पर्याय निवडण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेही त्यावर विचार करत असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल म्हणाले.

ट्रान्सहार्बरवरील वातानुकूलित लोकल गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहिले जाईल. त्यामुळे सामान्य लोकलच्या फे ऱ्या रद्द न करता अतिरिक्त लोकल फे ऱ्या चालवणे, भाडे कमी करणे यावर आताच बोलणे योग्य नाही. प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक राष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वातानुकूलित लोकलकडे आकर्षित करण्याचाही प्रयत्न आहे. 

– शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे

तिकीटदरांतील तफावत

ठाणे ते पनवेल वातानुकूलित लोकलचे भाडे १८५ रुपये असून याच मार्गावरील सामान्य लोकलचे द्वितीय श्रेणीचे भाडे १५ रुपये, तर प्रथम श्रेणीचे भाडे १४५ रुपये आहे. ठाणे ते ऐरोलीचे वातानुकूलित लोकलचे भाडे ७० रुपये असून सामान्य लोकलचे भाडे केवळ पाच रुपये आहे.