‘२६ जुलै २००५’ची आठवण करून देणाऱ्या मंगळवारच्या पावसात रेल्वे स्थानके वा उपनगरी गाडीत अडकलेल्या प्रवाशांनी मोठा संयम आणि सुज्ञपणा दाखविला. काही अपवाद वगळता अनेक तास प्रवासी गाडीतच किंवा रेल्वे स्थानकातच बसून राहिले.

आसनगाव-वासिंददरम्यान नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याने मंगळवारी सकाळीच कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यात थरकाप उडविणाऱ्या मुसळधार पावसाची भर पडली. दुपारनंतर ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ठाण्यापासून मुंबईकडे धावणाऱ्या उपनगरी गाडय़ा अप धिम्या मार्गावर थांबवून ठेवण्यात आल्या. पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक स्थगित ठेवण्यात आल्याची घोषणा ठाण्याच्या पुढील रेल्वे स्थानकांत करण्यात येत होती.

घाटकोपर रेल्वे स्थानकात दुपारी दोन-सव्वादोनच्या सुमारास फलाट क्रमांक दोनवर (अप धिमा मार्ग) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी धिमी उपनगरी गाडी आली आणि तिथेच थांबून राहिली. जवळपास अर्धा ते पाऊण तासानंतर ही गाडी पुढे जाणार नाही अशी घोषणा करण्यात आली. समोरच एक क्रमांकाच्या फलाटावरही डाऊन धिम्या मार्गावर प्रवाशांची तुडुंब गर्दी होती. पण तेथेही कुठे आरडाओरड नव्हती. फलाट क्रमांक दोनवर उभ्या असलेल्या गाडीतील काही प्रवाशांचा अपवाद वगळता बहुतांश प्रवासी दुपारी दोन वाजल्यावासून ते रात्री उशिरापर्यंत गाडीतच बसून राहिले होते. हेच चित्र इतर ठिकाणी अडकलेल्या उपनगरी गाडय़ांमधूनही पाहायला मिळाले.

२६ जुलै २००५ च्या पावसात उपनगरी गाडय़ा रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी खोळंबल्यानंतर अनेक प्रवाशांनी ज्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. रेल्वे मार्गातून चालत पुढच्या वा मागच्या रेल्वे स्थानकात पोहोचायचा निर्णय घेऊन गुडघाभर पाण्यातून चालत रेल्वे स्थानक गाठले होते. काहींनी रेल्वे स्थानकाबाहेर येऊन पूर्व किंवा पश्चिम द्रुतगती महामार्ग गाठून रिक्षा, टॅक्सी किंवा ‘बेस्ट’बसच्या आधाराने पुढील प्रवास सुरू केला होता. पण या दोन्ही महामार्गावर तसेच रस्त्यांवरही पाणी साठल्याने मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रेल्वे स्थानक किंवा उपनगरी गाडीतून बाहेर पडलेल्या अनेक प्रवाशांची अवस्था ‘आगीतून फुफाटय़ात’ अशी झाली होती. काही प्रवाशांना रेल्वे मार्गातून चालताना खाली असलेल्या नाल्यांचा अंदाज न आल्याने प्राण गमवावे लागले होते.

१२ वर्षांपूर्वीचा अनुभव लक्षात घेता २९ ऑगस्टच्या पावसात काही अपवाद वगळता बहुतांश प्रवाशांनी काळजी घेतली. रेल्वे स्थानकात खोळंबून राहिलेल्या गाडय़ांमध्ये प्रवासी निर्धास्त आणि सुरक्षितपणे बसून राहिले होते. आठ किंवा त्यापेक्षाही अधिक तास उपनगरी गाडी रेल्वे स्थानकात खोळंबून राहिली तरीही अनेक प्रवासी डब्यातच बसून राहिलेले पाहायला मिळाले. अर्थात काही जणांनी गाडीतून उतरून रस्ता मार्गाने बस, रिक्षा, टॅक्सीच्या माध्यमातून घरी पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण ते रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने त्यात अडकून पडले.