20 October 2019

News Flash

बेघरांसाठी रात्रनिवारा;फेरीवाल्यांचीही पथारी

माहीममधील शाहूनगर पादचारी पुलावर प्रवाशांची कसरत

माहीममधील शाहूनगर पादचारी पुलावर प्रवाशांची कसरत

प्रसाद रावकर, मुंबई

पदपथावरील अनधिकृत झोपडय़ांवर हातोडा चालवत पालिकेने हुसकावून लावलेले झोपडपट्टीवासी आणि त्यांच्या जोडीने भिखारी, गुंड प्रवृत्तीच्या बेघर व्यक्तींनी माहीम परिसरातील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या शाहूनगर पादचारी पुलावरच रात्री ठाण मांडण्यास सुरुवात केली आहे.

अंधार पडताच पादचाऱ्यांची तमा न बाळगता ही मंडळी पादचारी पुलावरच वळकटी पसरून निद्रिस्त होत आहेत. या प्रकारामुळे पादचारी धास्तावले आहेत. मात्र सेनापती बापट मार्गावरून शाहूनगर, धारावी आणि आसपासच्या परिसरात जाण्यासाठी हा एकमेव जवळचा मार्ग असल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने या पुलावरून जावे लागत आहे. राजकारणीही हा प्रश्न सोडविण्यास असमर्थ ठरत असल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात रहिवाशी आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये धारावी आणि शाहूनगर परिसरातील लोकवस्तीमध्ये वाढ होत गेली आणि नागरिकांच्या सोयीसाठी माहीम पूर्व-पश्चिम भाग जोडण्यासाठी १९७०-७१ दरम्यान हा पादचारी पूल बांधण्यात आला. या पुलामुळे धारावी आणि शाहूनगर परिसरातील रहिवाशांना माहीम पूर्व आणि पश्चिम भागात जाण्यासाठी एक पर्याय उपलब्ध झाला. मात्र माहीम स्थानक आणि पुलाच्या पायऱ्यांदरम्यानच्या पदपथावर अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहिल्या आणि फेरीवाल्यांनही तेथेच पथाऱ्या पसरल्या. याच परिसरात छोटी-मोठी कामे करून झोपडपट्टीवासी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत होते. गेली अनेक वर्षे झोपडपट्टीवासीय आणि फेरीवाल्यांच्या गर्दीतून वाट काढत रेल्वे स्थानक गाठणारे प्रवाशी कमालीचे अस्वस्थ झाले होते. याबाबत प्रवाशांनी वारंवार पालिकादरबारी तक्रारी केल्या. अखेर पालिकेने या झोपडय़ा हटविल्या. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळा झाला. याच परिसरात काम करणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना रात्रीच्या वेळी थेट पादचारी पुलाचाच ताबा घेण्यास सुरुवात केली. दिवसभर कामात व्यस्त असणारी ही मंडळी अंधार पडताच पुलावरच अंथरुण पसरून निद्रिस्त होऊ लागली. त्यामध्ये भिखारी, फेरीवाले यांचाही समावेश आहे. त्यामुळे या पुलाला रात्र निवाऱ्याचे स्वरूप आले आहे. माहीम रेल्वे स्थानकातून रात्री उशिरा मोठय़ा संख्येने प्रवाशी पुलावरून धारावी, शाहूनगर परिसरात जात असतात. पुलावर निद्रावस्थेत असलेल्या झोपडपट्टीवासीयांमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलावर झोपणाऱ्यांमध्ये लपलेल्या भुरटय़ा चोरांकरवी हल्ला होण्याची भीतीही काही प्रवाशांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. पुलावर बेकायदेशीरपणे झोपणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

रहिवाशांची मागणी लक्षात घेत सेनापती बापट मार्गावरील कॅनरा बँकेपर्यंत विस्तार करण्यात आला.

आजघडीला धोकादायक बनलेल्या या पुलाचा पश्चिमेचा भाग बंद करण्यात आला आहे. मात्र सेनापती बापट मार्गावर जाण्यासाठी अन्य पर्यायच नसल्यामुळे पुलाचा काही भाग पादचाऱ्यांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. या भागात झोपडपट्टीवासी, भिखारी, अनधिकृत फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. रात्रीच्या वेळी मोठय़ा संख्येने अनधिकृत फेरीवाले आणि गुंड प्रवृत्तीची मंडळींचा पुलावर वावर असतो. धारावी परिसरातील असंख्य रहिवाशी रात्री माहीम स्थानकात उतरून पुलावरून आपल्या घराच्या दिशेने जात असतात. मात्र भिखारी आणि गुंड प्रवृत्तीच्या मंडळींमुळे त्यांना जीव मुठीत घेऊन पुलावरून जावे लागते. या समस्येकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे माटुंगा लेबर कॅम्प, गीतांजली नगर, कमला नगर, बालिगा नगर आणि धारावी परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

जीव धोक्यात

धारावी, शाहूनगरमधील रहिवाशांना या पुलाचा वापर करीत सेनापती बापट मार्गावर उतरून माहीम स्थानक गाठावे लागते. माहीम रेल्वे स्थानकात जाण्यासाठी पादचारी पुलाच्या उजव्या आणि डाव्या दिशेकडून मार्ग उपलब्ध करण्यात आला. असे असले तरी या पुलावरून थेट रेल्वे स्थानकावर उतरण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पुलावरून सेनापती बापट मार्गावर उतरूनच प्रवाशांना रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे. या परिसरात पाच-सहा शाळा असून शाहूनगरमध्ये वास्तव्यास असलेले अनेक विद्यार्थी शाळेमध्ये जाण्यासाठी याच पादचारी पुलाचा वापर करीत आहेत. मात्र या पुलावरून सेनापती बापट मार्गावर उतरणाऱ्यांना अन्य भागांत जाण्यासाठी रस्ता ओलांडावा लागत होता. त्यामुळे अपघाताच्या घटना घडू लागल्या होत्या.

First Published on April 23, 2019 2:12 am

Web Title: passengers suffer due to beggars on shahunagar footover bridge footover bridge