26 September 2020

News Flash

‘तेजस’ आहे तरीही..

ही एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेवर चालवण्यासाठी आयआरसीटीसी रेल्वे प्रशासन दरवर्षी सात कोटी रुपये मोजणार आहे.

विमानसेवांप्रमाणे सुविधा असूनही सुधारणेसाठी प्रवाशांकडून सूचनांचा भडिमार

सुशांत मोरे, लोकसत्ता

मुंबई :  विमानसेवेप्रमाणेच उत्तम सुविधा नव्याने सुरू झालेल्या मुंबई ते अहमदाबाद ते मुंबई वातानुकूलित तेजस एक्स्प्रेसमध्ये देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी तेजस एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र शताब्दी आणि दुरोन्तो एक्स्प्रेसपेक्षा असलेले जादा भाडे, तेजसची योग्य नसलेली वेळ अशा अनेक सूचनांचा भडिमार प्रवाशांनी केला. ही एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेवर चालवण्यासाठी आयआरसीटीसी रेल्वे प्रशासन दरवर्षी सात कोटी रुपये मोजणार आहे.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझमकडून (आयआरसीटीसी) चालवण्यात येणारी तेजस एक्स्प्रेस साडेसहा तासांत दोन शहरांतील अंतर पार करते. या एक्स्प्रेसला शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अहमदाबाद येथील स्थानकातून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल मात्र अनुपस्थित होते.

महसूल मिळवण्याच्या उद्दिष्टाने रेल्वे मंत्रालयाने व्यावसायिक पद्धतीने रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिल्ली ते लखनऊ  अशी पहिली तेजस एक्स्प्रेस काही महिन्यांपूर्वी धावल्यानंतर पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी अहमदाबाद ते मुंबई मार्गावर दुसरी तेजस एक्स्प्रेस धावली. ७३६ प्रवासी क्षमता असलेली तेजस एक्स्प्रेस पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाली. उत्तम वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसनव्यवस्था, प्रवाशांना पुढच्या स्थानकाची माहिती देणारी उद्घोषणा, इलेक्ट्रॉनिक इंडिकेटर, वायफाय सुविधा, सुरक्षारक्षक व प्रत्येक डब्यात दोन सीसीटीव्ही कॅमेरे, खाद्यपदार्थाची रेलचेल, प्रत्येक डब्यात प्रवाशांच्या सेवेत दोन कर्मचारी एक्स्प्रेसमध्ये आहे.

मात्र तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्या दिवशी प्रवाशांनी काहीशी नाराजी व्यक्त करत सूचना केल्या आहेत. ट्रेनमध्ये उपस्थित आयआरसीटीसीच्या बडय़ा अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनांचा पाढाच वाचून दाखवला. अहमदाबादमध्ये राहणारे पंकज त्रिवेदी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, राजधानी व शताब्दी एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थाप्रमाणे तेजसमधील खाद्यपदार्थाचा दर्जा फारसा चांगला नाही. त्यात सुधारणेची गरज आहे. पॅकिंग पदार्थ देण्याऐवजी त्वरित तयार होऊन येणाऱ्या पदार्थावरही भर देता येईल का ते पाहणे गरजेचे आहे. मुंबईतून अहमदाबादसाठी जाताना प्रथम गुजराती खाद्यपदार्थ, तर अहमदाबादमधून मुंबईकडे प्रवासाला निघताना प्रथम मराठी पदार्थ द्यावेत. त्यामुळे प्रवासावेळी एक वातावरणनिर्मिती तयार होईल.

अहमदाबादमधून मुंबईला सुटताना ही एक्स्प्रेस सकाळी ६.४० वाजता सुटणार असल्याने त्यात बदल झाला पाहिजे. त्याआधी दोन सुपरफास्ट गाडय़ा असल्याने या गाडीला प्रवासी मिळणे महत्त्वाचे असल्याचेही त्रिवेदी यांनी नोंदविले. शिवकुमार मिश्रा यांनीही तेजसच्या वेळेत बदल करणे गरजेचे असल्याचे सांगितले. अहमदाबादमधून सकाळी कर्नावती एक्स्प्रेस ४.५५ वाजता, त्यानंतर ६ च्या सुमारास डबल डेकर आणि ६.४० वाजता तेजत एक्स्प्रेस सुटणार आहे. तेजसच्या आधीही दोन सुपरफास्ट असल्याने त्याला प्रवासी मिळतील का, हा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. आता उत्साहापोटी प्रवासी येत आहेत, मात्र नंतर मिळतील का, हा विचार करणारा प्रश्न असेल असे सांगितले.

प्रवाशांना खिडक्यांजवळ दिलेले मोबाइल चार्जिगची जागा बदलणे, एक्स्प्रेस वेगात जाताना त्याला बसणाऱ्या धक्क्यांमुळे ही समस्या सोडवणे आदी सूचनाही प्रवाशांनी केल्या. तेजस एक्स्प्रेसचे पहिले तिकीट काढणाऱ्या पाच प्रवाशांचा यावेळी सत्कार केला. तर तीन प्रवाशांचा वाढदिवसही साजरा केला.

तेजस एक्स्प्रेस सुटण्याची वेळ

तेजस एक्स्प्रेस १९ जानेवारीपासून नियमितपणे सुटेल. ट्रेन ८२९०२ अहमदाबादमधून सकाळी ६.४० वाजता सुटेल आणि मुंबई सेन्ट्रलला दुपारी १.४० वाजता पोहोचेल. तर मुंबई सेन्ट्रल येथून दुपारी ३.४० वाजता सुटून अहमदाबाद येथे रात्री ९.५५ वाजता पोहोचणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 2:27 am

Web Title: passengers suggestions for improving facilities in tejas express zws 70
Next Stories
1 मतदान आणि मतपावत्या यंत्रे ठेवण्यासाठी जागांची शोधाशोध
2 धावण्यासाठी मुंबई सज्ज!
3 ७५ टक्के वैद्यकीय, निमवैद्यकीय जागा रिक्त
Just Now!
X