प्रसाद रावकर

पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेत मुंबई महापालिकेने २०१६ मध्ये पदपथविषयक धोरण आखून मुंबईकरांना गोड गुलाबी स्वप्न दाखविले. मात्र तीन वर्षे लोटली तरी या धोरणातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकाही पदपथावर पादचारीस्नेही बदल होऊ शकलेला नाही. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आखलेले प्रशासनाचे धोरण केवळ लोणकढी थाप ठरली आहे.

‘माझ्या आईवडिलांनाही मुंबईच्या पदपथांवरून चालण्याची भीती वाटते’ अशी कबुली देत तत्कालीन महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शहरातील पदपथांची दुर्दशा मान्यच केली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने डिसेंबर २०१६मध्ये शहरातील पदपथ पादचारीपूरक करण्यासाठी धोरण आणले. रस्त्यावरील पहिला अधिकार पादचाऱ्यांचा असल्याचा मान्य करून पदपथ धोरण आखले गेले. परंतु, अरुंद रस्ते, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि त्यात पदपथांची चित्रविचित्र आणि पादचारीविरोधी रचना यामुळे हे धोरण कागदावरच राहिले आहे.

पूर्वी मुंबईमधील पदपथांवर फरश्या बसविण्यात आल्या होत्या. पदपथावरील अतिवर्दळीमुळे होणारी झीज वा तुटणाऱ्या फरशा बदलण्याचे काम पालिका करीत होती. मात्र पावसाळ्यात शेवाळामुळे गुळगुळीत होणाऱ्या फरशा उखडण्यात आल्या आणि त्यांची जागा पेवरब्लॉकने घेतली. पेवरब्लॉक बसविण्याच्या त्रुटींमुळे पदपथ ओबडधोबड, असमतोल होऊ लागले, तर काही ठिकाणचे पेवरब्लॉक उखडल्याने पदपथांवर खड्डे पडू लागले. त्याचबरोबर पदपथांवर पथाऱ्या पसरून बसणाऱ्या फेरीवाल्यांचा उपद्रवही पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या हातगाडय़ा, स्टॉल्सनीही पदपथांवरच अतिक्रमण केले. काही पदपथांवर झोपडय़ा उभ्या राहिल्या. परिणामी, मुंबईमधील पदपथ पादचाऱ्यांसाठी असुरक्षित बनले आहेत.

पालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करीत २०१६मध्ये पदपथ धोरणाची घोषणा केली. पदपथाचा आकार, पादचाऱ्यांची संख्या आदींचा अभ्यास करून हे धोरण आखण्यात आले. त्यामुळे येत्या एक-दोन वर्षांमध्ये मुंबईमधील पदपथांमध्ये सुधारणा होईल अशी भाबडी आशा मुंबईकरांना होती. पण पालिकेने मुंबईकरांचा भ्रमनिरास केला आहे. धोरणाला प्रशासकीय मंजुरी देऊन तीन वर्षे लोटली तरी पादचारीस्नेही पदपथ उभा राहू शकलेला नाही. .

पदपथ धोरण काय म्हणते?

* पादचाऱ्यांची वर्दळ अधिक असलेल्या ठिकाणी (उदाहरणार्थ रेल्वे स्थानकांच्या बाहेरील परिसरात) पदपथाची रुंदी अधिक ठेवणे

*  पदपथावरील २.२० मीटर उंचीचा भाग मोकळा ठेवणे बंधनकारक

* पदपथाच्या पृष्ठभागावर भेगा अथवा चढ-उतार असू नये.

* पदपथावरील विजेचे खांब, झाडे, मार्गदर्शक फलक, टपाल पेटी, कचरा पेटी आदी पदपथाच्या एकाच बाजूला असाव्या.

* पदपथाची रुंदी तीन भागात विभागण्यात आली असून अर्धा मीटर रुंदीचा पहिला भाग मृत भाग निश्चित करण्यात आला आणि त्यात दुकाने आणि मालमत्तेची रेखा समाविष्ट करण्यात आली. त्याला लागून दुसरा भाग पादचाऱ्यांसाठी आणि त्यापुढील तिसरा भाग स्ट्रीट फर्निचरसाठी निश्चित करण्यात आला.