जीटी रुग्णालयाच्या कारभारावर कुटुंबीयांचा आरोप

मुंबई : जीटी रुग्णालयात दाखल झालेल्या ४५ वर्षीय रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी  डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. योग्य निदान न करता उपचारात करण्यात झालेल्या विलंबामुळे रुग्ण दगावल्याचा दावा करत संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील फणसवाडी येथे राहणारे रघुनाथ कुळेकर (४५) यांच्या छातीत शुक्रवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून दुखू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नजीकच्या जीटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ईसीजी तपासणी करून त्या अहवालाच्या आधारे कुळेकर यांची तब्येत बरी असल्याचा निर्वाळा दिला व त्यांना वॉर्डमध्ये दाखल केले. परंतु सकाळी सव्वानऊच्या सुमारास कुळेकर खाली कोसळले. यानंतरही सुमारे दोन तास डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले नाहीत. सव्वाअकरानंतर कुळेकर यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले; परंतु पावणेएकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती कुळेकर यांचा पुतण्या शशिकांत यांनी दिली.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रघुनाथ यांचा मृत्यू झाल्याचा दावा कुळेकर कुटुंबीयांनी केला असून संबंधित डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली. कुटुंबीयांनी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, जीटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे आणि पोलीस अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. तेव्हा या प्रकरणी चौकशी करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया करण्यात आली.