राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या राज सुब्रह्मण्यम या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या त्याच्या नातेवाईकांनी रविवारी दुपारी रुग्णालयाची नासधूस करत डॉक्टरांना मारहाण केली. यात रुग्णालयातील अपघात विभागाचेही नुकसान झाले आहे.
रविवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी राजला राजावाडी रुग्णालयात आणले. घाटकोपर येथील गरोडिया नगराजवळील ९० फूट रस्त्याजवळ त्याला बसने धडक दिली होती. अपघात विभागात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी त्याला तपासून तो आणण्यापूर्वीच मृत झाल्याचे जाहीर केले. मात्र या बातमीने चिडलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करण्यास व रुग्णालयाची नासधूस करण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, टिळकनगर पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
‘तरूण मृत झाल्याचे कळल्यावर नातेवाईकांनी अपघात विभागाचा काचेचा दरवाजा फोडला. तसेच अपघात विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. काशीनाथ जाधव यांच्या डोक्यावर वार केला,’
अशी माहिती रुग्णालयाचे वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चोपडे यांनी दिली.