फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णवाढीमध्ये मुलुंड हे प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ अंधेरी, चेंबूर, वांद्रे, देवनार, वडाळा-सायन, भांडुप, गोरेगाव, घाटकोपर येथील रुग्णवाढ जास्त आहे. मात्र पश्चिम उपनगरातील बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या भागांत सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. तर पूर्व उपनगरातील मुलुंड, घाटकोपर, भांडुप या भागाचा क्रमांक त्या खालोखाल आहे. मुंबईतील एकूण उपचाराधीन रुग्णांच्या ३० टक्के रुग्ण हे पश्चिम उपनगरातील पाच विभागांमध्ये आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आटोक्यात आलेली करोनाची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. दर दिवशी दीड हजारापर्यंत नव्या रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. ०.२२ टक्क्यांपर्यंत खाली आलेला रुग्णवाढीचा दर ०.३८ टक्क्यांवर गेला आहे. मात्र त्यातही मुलुंड, अंधेरी, जोगेश्वरी, चेंबूर, वांद्रे, देवनार-मानखुर्द, सायन-वडाळा, भांडुप, गोरेगाव, घाटकोपर, कांदिवली, कुर्ला येथे रुग्णवाढ सर्वात जास्त आहे. रुग्णवाढीच्या सरासरी दरापेक्षा येथील रुग्णवाढ जास्त वेगाने होते आहे. मुलुंडमधील रुग्णवाढीचा दर ०.५८ टक्के  आहे. मुलुंडमध्ये गेल्या आठवड्याभरात दररोज १००च्या आसपास नव्या रुग्णांची नोंद होते आहे. तर अंधेरी, जोगेश्वरीत दर दिवशी १२०च्या पुढे रुग्णांची नोंद होते आहे.  मुंबईत सध्या जे रुग्ण आढळत आहेत. ते विशेषत: इमारतीतील रुग्ण आहेत.  ज्या भागात बैठ्या चाळींपेक्षा इमारतींची संख्या जास्त आहे अशा भागात रुग्ण जास्त आढळत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईत सध्या २२० इमारती प्रतिबंधित आहेत. त्यापैकी सर्वाधिक ५० इमारती या अंधेरी, जोगेश्वरीचा पश्चिम भाग असलेल्या के  पश्चिम विभागात आहेत. तर त्याखालोखाल कांदिवली, भांडुप, चेंबूर येथे २५ ते २७ इमारती प्रतिबंधित आहेत. उच्चभ्रू विभाग असलेल्या मलबार हिल, ग्रँटरोडमध्ये १५ इमारती प्रतिबंधित आहेत.