ठाणे जिल्ह्य़ातील रुग्णवाढ चिंताजनक आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे सुविधा तातडीने उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाणे जिल्ह्य़ातील महापालिकांना दिले.

जिल्ह्य़ात करोनावर नियंत्रण मिळविण्यात अपयशाचा ठपका ठेवून पालिका आयुक्तांच्या बदल्यांचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर मुंबई महापालिकेप्रमाणे कार्यपद्धती अमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुन्हा टाळेबंदीची अनुमतीही पालिकांना देण्यात आली. मात्र त्यांनतही करोनावर नियंत्रण मिळविण्याच ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या महापालिकांना यश आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पालिका आयुक्तांशी संवाद साधत कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या वेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता उपस्थित होते.

करोनाची वाढ गुणाकाराने होत आहे. त्यामुळे तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईमध्ये ज्या रीतीने सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या आहेत तशा सुविधा ठाणे जिल्ह्य़ातील पालिकांनी करणे अपेक्षित होते आणि वारंवार तशा सूचना देऊनही पाहिजे तेवढय़ा सुविधा उभारलेल्या दिसत नसल्याद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

येत्या काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारणे सुरू करा. यात मोठे उद्योग, कंपन्या, संस्था यांचीदेखील मदत घ्या. मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ड्रेनेज, शौचालय, पिण्याचे पाणी या सोयी आहेत. आयसीयू, डायलिसिस सुविधा आहेत. तशाच सुविधा निर्माण करा तसेच औषधांचाही पुरेसा साठा करून ठेवण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले.

सूचना काय? :  करोनाची ही लढाई फक्त सरकारची नाही. वाडय़ा आणि वस्त्या, वसाहतीमध्ये नागरिकांच्या करोना दक्षता समित्या बनवा. स्वयंसेवी संस्था, युवकांना यात सहभागी करून घ्या. ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक यांना दुसरे काही आजार आहेत का, तसेच त्यांची ऑक्सिजन पातळीबरोबर आहे का, परिसरात कुणाला काही आजार आहेत का, स्वच्छता नियमित केली जाते का, याबाबतीत नागरिकांच्या समित्यांची मदत घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

२४ तासांत १,७९३ नवे बाधित : ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी दिवसभरात तब्बल १ हजार ७९३ नवे रुग्ण आढळले. त्यातील ५८० रुग्ण हे कल्याण-डोंबिवली शहरातील असून, गेल्या काही दिवसांपासून या शहरातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागल्यामुळे शहरातील परिस्थिती चिंताजनक बनू लागली आहे. जिल्ह्य़ात दिवसभरामध्ये ५० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या १ हजार ४५४ वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रसार अधिक वेगाने होत असून या शहरातील एकूण रुग्णसंख्येने आता दहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे.