प्रसाद रावकर

मुंबई महापालिकेच्या पथकांनी घरोघरी जाऊन तब्बल सात लाखांहून अधिक रहिवाशांची केलेली तपासणी, रुग्णसेवेसाठी सज्ज झालेले पालिका आणि खासगी दवाखाने, ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन केलेले उपचार, करोनाबाधितांच्या संपर्कातील संशयितांना वेळीच विलगीकरणात ठेवण्यासाठी उचललेली पावले आदी कारणांमुळे धारावीमधील करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला यश येऊ लागले आहे.

आतापर्यंत सुमारे १,८९९ धारावीकरांना करोनाची बाधा झाली होती. त्यापैकी ४६.८५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. धारावीतील मृत्युदर ३.७६ टक्के असून आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूणच धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे.

काही दिवसांपूर्वी धारावीमध्ये मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण सापडत होते. त्यामुळे पालिकेचे धाबे दणाणले होते. पालिकेने खासगी डॉक्टरांचा सहभाग असलेल्या पथकांची स्थापना करून घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी मोहीम हाती घेतली. या पथकांनी आतापर्यंत तब्बल चार लाख ७६ हजार ७७५ रहिवाशांची तपासणी केली. पालिकेचे नऊ, तर खासगी ३५० दवाखाने सुरू करण्यात आले.

खासगी डॉक्टरांनी ४७ हजार ४०० जणांची, तर पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ८७९ जणांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर आठ हजार २४६ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी झाली. खासगी डॉक्टरांनी मोबाइल व्हॅनद्वारे १४ हजार ९७० रहिवाशांना तपासले. याशिवाय अन्य खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यांमध्ये सुमारे दोन ते अडीच लाख नागरिकांनी वैद्यकीय तपासणी केली. अशा एकूण सात लाखांहून अधिक धारावीकरांची तपासणी झाली.

३८ हजार जणांचे गृहविलगीकरण

धारावीमध्ये अति जोखमीच्या गटात १० हजार ४१२, तर कमी जोखमीच्या गटात ३८ हजार १२५ व्यक्तींचा समावेश होता. सुमारे ३८ हजार ३४ संशयित रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते, तर अति जोखमीच्या गटातील सुमारे आठ हजार ४१० संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. वेळीच उपचार झाल्याने यापैकी बहुतांश व्यक्ती बऱ्या झाल्या असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या आठवडय़ापासून धारावीमधील रुग्णसंख्यावाढीचा वेग मंदावल्याचे निदर्शनास आले आहे.