लक्षणे असलेल्या करोनाबधित ज्येष्ठ नागरिकांना करोना रुग्णालयात दाखल होणे आता बंधनकारक असणार आहे. जोखमीच्या गटातील या रुग्णांमधील संभाव्य धोके टाळण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

घरामध्ये स्वतंत्र खोली असल्यास सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणाची परवानगी भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने(आयसीएमआर) दिली. त्यामुळे इमारतीतील बहुतांश रुग्णांचा घरीच विलगीकरणात राहण्याकडे कल आहे.  यांच्यातील काही ज्येष्ठ रुग्ण, विशेषत: उच्च रक्तदाब, मधुमेह असे  आजारी असलेल्या रुग्णांची प्रकृती अचानक बिघडली होती. खाट उपलब्ध करून त्यांना रुग्णालयात देखील हलविले होते. परंतु तोपर्यंत त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळेच ६० वर्षांवरील लक्षणे असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरण करू नये, असे आदेश पालिकेने दिले असल्याचे विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा काही घटनांमध्ये  खाट उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी पालिकेवर केला आहे.

६० वर्षांवरील रुग्णांची प्रकृती खालावल्यानंतर उपचारासाठी धावपळ करणे योग्य नाही. वेळेत उपचार मिळावेत यासाठी नातेवाईकांच्या पसंतीनुसार रुग्णाला पालिकेच्या किंवा खासगी आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये ६० वर्षांवरील रुग्ण करोना आरोग्य केंद्रामध्ये दाखल होण्यास तयार नसतात. त्यामुळे देखील असा नियम करण्याची वेळ पालिकेवर आल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत सर्वाधिक म्हणजे ५७ टक्के मृत्यू हे  ६० वर्षांवरील रुग्णांचे झाल्याची नोंद आहे.  यात ६० ते ७० वयोगटात १९४७, ७० ते ८० मध्ये १३१२, ८० ते ९० मध्ये ५६९ आणि ९० ते १०० या वयोगटातील ५५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

पाच ते नऊ दिवस अधिक धोक्याचे

६० वर्षांवरील आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना सुरुवातीचे चार दिवस सौम्य लक्षणे असली तरी साधारण पाच ते नऊ दिवसांमध्ये अचानक ऑक्सिजनची पातळी कमी होते. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णामध्ये रात्रीच्या वेळेस उठून शौचास जाताना हे अधिकतर आढळले आहे. अशा वेळेस तातडीने उपचार देणे गरजेचे असते. परंतु रुग्ण घरी असल्यास रुग्णालयात दाखल होईपर्यंत किमान चार तास जातात आणि रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या रुग्णांनी आरोग्य केंद्रामध्ये देखरेखीखाली राहणे अधिक सुरक्षित असल्याचे बॉम्बे रुग्णालयातील डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले.