अमर सदाशिव शैला, निलेश अडसूळ

टाळेबंदीनंतर वाहतुक व्यवस्था बंद झाल्याने मुंबईत उपचारासाठी आलेले रुग्ण इथेच अडकून पडले आहेत. मुंबईत इतरत्र राहण्याची सोय नसल्याने या रुग्णांनी केईएम आणि टाटा रुग्णालयाबाहेरील पदपथांचा  आसरा घेतला आहे. टाळेबंदी हटेपर्यंत या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना येथे राहण्याशिवाय गत्यंतर नाही.

टाळेबंदीचा फटका परळमधील केईएम आणि टाटा रुग्णालयात राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना बसला आहे. वाहतुकीची साधनेच उपलब्ध नसल्याने घरी कसे जायचे हा प्रश्न या रुग्णांना आहे. त्यामुळे रुग्णालयासमोरील पदपथावरच हे कुटुंबिय रुग्णासह राहत आहेत.

रुग्णांसोबत असलेली लहान मुले डासांचा चावा सहन करत इथेच दिवसरात्र काढत आहेत. मागील आठ-दहा दिवसांपासून येथेच राहत असल्याने बहुतांश रुग्णांजवळील पैसे आता संपले आहेत. सामाजिक संस्थांकडून वाटप केलेल्या अन्नावरच त्यांची गुजराण सुरू आहे.

विष्णू बिश्वास हे ५० वर्षीय गृहस्थ पष्टिद्धr(१५५)म बंगालमधून कर्करोगावरील उपचारांसाठी मुंबईत टाटा रुग्णालयात आले आहेत. त्यांच्यावर केमोथेरपी झाली असून दर तीन महिन्यांनी उपचारांसाठी त्यांना टाटा रुग्णालयात यावे लागते. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात ते मुंबईत दाखल झाले. सोमवारी २२ मार्चला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र गावी जाण्यासाठी रेल्वेच बंद असल्याने त्यांना मुंबईत थांबण्याशिवाय पर्याय नाही. मात्र इथे राहण्याची सोय नाही आणि खासगी ठिकाणी भाडे भरून राहण्यासाठी खिशात पैसे नाहीत, अशी त्यांची स्थिती आहे.

पश्चिम बंगालला परतण्यासाठी ठेवलेले पैसेही आता संपल्याचे विष्णू सांगतात. संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीवर विष्णू आणि त्यांची पत्नी भूक भागवत आहेत. काठीशिवाय ते जागेवरून हलू शकत नाहीत.

हीच अवस्था ४८ वर्षीय सीतामुनी कुंवर यांची आहे. बिहारहून त्या पोटाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. परंतु वाहतूक बंदीमुळे २५ मार्चला होणारा त्यांचा परतीचा प्रवास इथेच स्थगित झाला. ‘आम्हाला खाण्यापिण्याची वानवा नाही. इथले लोक आम्हाला काही कमी पडू देत नाही. परंतु वाहतूक बंदीमुळे माझ्यासोबत नातेवाईकही इथे अडकून पडले आहेत,’ असे सीतामुनी सांगतात. तर ताराबाई सोनकांबळे या ज्येष्ठ नागरिक महिला पायावरील उपचारांसाठी सोलापूरहून केईएम रुग्णालयात २० मार्चला आल्या होत्या.

डॉक्टरांनी तपासून टाळेबंदीनंतरची तारीख दिली आहे. मात्र गाडय़ाच नसल्याने कागदाचे पुठ्ठे रस्त्याकडेला अंथरून त्यावरच त्या झोपत आहेत. सुजलेला पाय दाखवत ही टाळेबंदी किती दिवस चालणार अशी विचारणा त्या करतात. खासगी गाडीवाले बेसुमार भाडेआकारणी करत असल्याने प्रवास करून घर गाठणेही शक्य नसल्याचे त्या सांगतात.

आठ दिवस पदपथावर

अप्लास्टिक अ‍ॅनिमिया झालेल्या आपल्या ६ वर्षीय मुलीला घेऊन धनश्री आणि अतुल चव्हाण हे जोडपे गेली आठ दिवस पदपथावर राहत आहेत. मुलीच्या उपचारासाठी तुळजापूरहून आलेल्या या जोडप्याने घरी जाण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु खासगी वाहतूक सेवांनी दाखवलेला आडमुठेपणा खिशाला न परवडणारा होता. त्यांच्यासोबत त्यांची १ वर्षांची दुसरी मुलगीही आहे. दोन लहान मुलांना घेऊन आठ दिवस मुंबईच्या रस्त्यावर राहणे किती भीषण आहे हे त्यांच्या बोलण्यातून वारंवार जाणवत होते. ‘विशेष म्हणजे या सर्व रुग्णांची वैयक्तिक स्वच्छता राखणेही यांना आता परवडेनासे झाले आहे. शौचास जाण्यासाठी यांना दररोज पाच रुपये तर अंघोळीसाठी कुठे १० कुठे २० तर कुठे ३० रुपये मागितले जात आहे. रुग्णालय आणि सुलभतर्फे चालवल्या जाणाऱ्या शौचालयात अडचणीच्या काळातही अशा पद्धतीने घेतले जाणारे पैसे योग्य आहेत का?’ असा सवालही ते करतात.