उत्तेजके आणि संसर्ग दोन्ही कारणीभूत

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : मधुमेह नसलेल्या करोना रुग्णांना संसर्गातून बरे झाल्यानंतर मधुमेह होत असल्याचे दिसून येत आहे. काही रुग्णांना मधुमेह तात्पुरत्या काळापुरता तर काही रुग्णांना कायमस्वरूपी जडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वेळीच यावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘करोनाबाधित रुग्णांना आधीपासून मधुमेह असतो. त्या रुग्णांमध्ये मधुमेहाची तीव्रता वाढते. साखरेची पातळी ३०० ते ४०० च्यावर जाते. काही रुग्ण हे मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये मधुमेहाची आनुवंशिकता असते किंवा लठ्ठपणा असतो. यामुळे त्यांना काही काळाने मधुमेह होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांची साखरेची पातळी संसर्गादरम्यान वाढते आणि संसर्गातून बरे झाल्यावर त्यांना मधुमेह होतो. काही रुग्ण असेही आहेत की जे मधुमेहाच्या पूर्वस्थितीतही नाहीत, परंतु संसर्गानंतर त्यांना मधुमेहाची बाधा झाली आहे. यातही स्टिरॉइडमुळे (उत्तेजक) इन्सुलिनचे काम नीट होत नसल्याने (इन्सुलिन रेझिस्टंट) रुग्णामधील साखरेची पातळी वाढते आणि तात्पुरती मधुमेहाची बाधा होते. या रुग्णांमध्ये मधुमेह हा साधारण तीन आठवडे ते तीन महिन्यांपर्यंत राहतो. परंतु काही रुग्णांमध्ये संसर्गामुळे स्वादुपिंडाच्या बिटापेशींवर परिणाम झाल्याने मधुमेह जडतो. हा मधुमेह कायमस्वरूपी असतो. याला करोनामुळे झालेला मधुमेह असे म्हटले जाते, असे मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

करोनादरम्यान मधुमेहाची बाधा झाली आणि ती पुढे कायम राहिली असे सुमारे ३० टक्के रुग्ण आढळले आहेत. यातील १० टक्के रुग्णांना आधीपासूनच मधुमेह होता किंवा पूर्वस्थितीत होते. परंतु त्याची तपासणी केली नसल्याने समजले नाही. परंतु २० टक्के रुग्ण असे आहेत की ज्यांना करोना संसर्गामुळे मधुमेह झाला आहे, असे म्हणता येईल. यात आणखी बाब अशी की उत्तेजक शरीरात तयार होत असतात. बाहेरून उत्तेजकांचा पुरवठा केली की शरीरात स्टिरॉइड तयार करणाऱ्या यंत्रणेवर काही परिणाम होतात. त्यामुळे पुढील काळात उत्तेजके खूप काळ दिलेल्या व्यक्तींना मधुमेहाची बाधा होण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे, असे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. सतीश नाईक यांनी व्यक्त केले.

करोनानंतर मधुमेहाची बाधा झालेल्या किंवा मधुमेह नव्याने झालेल्या रुग्णांना किमान तीन महिने तरी इन्सुलिन द्यावे लागते. काही रुग्णांनी करोनातून बरे झाल्यावर योग्य आणि वेळेवर संतुलित आहार, व्यायाम असे जीवनशैलीत बदल घडविल्यामुळे तीन ते सहा महिन्यांनंतर मधुमेह निघून गेल्याचेही दिसून आले आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे,त्याने म्युकरमायकोसिससारख्या आजारांची बाधा ही होणार नाही, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार

अनेक रुग्णांना संसर्ग झाल्यामुळे तपासणी केल्यावर मधुमेह झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे ३५ वर्षांवरील व्यक्तीने दर पाच वर्षांनी एकदा मधुमेह, रक्तदाब इत्यादी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे मधुमेहाचे बहुतांश

रुग्ण एकदा डॉक्टरकडे जातात आणि वर्षांनुवर्षे तीच औषधे घेत राहतात. याचे गंभीर परिणाम शरीरावर होत असतात. रुग्णांच्या शरीरात होणारे बदल डॉक्टरला तपासून लक्षात येतात. त्यामुळे त्याच चिठ्ठीवर पुन्हा औषधे घेऊ नयेत. वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत. एकाच चिठ्ठीवर वारंवार औषधे न  देण्याबाबतचा कायदा लागू करणे आवश्यक आहे, असे डॉ. नाईक म्हणाले.

जीवनशैलीत बदल हाच पर्याय

वेळेवर, सावकाश जेवण करणे, संतुलित आहार, व्यायाम, घरच्या घरी शतपावली, सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम, किमान सात तास पुरेशी झोप, चिंतन करणे, मोबाइल किंवा स्क्रीनचा वापर कमी करणे असे जीवनशैलीत बदल केल्यास करोना व मधुमेहाला सामोरे जाता येईल, असा सल्ला डॉ. शशांक जोशी यांनी दिला आहे.