गर्भलिंगनिदान कायद्याअंतर्गत होणारी जाचक कारवाई रोखण्याकरिता खासगी रेडिओलॉजिस्टनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांचे कामकाज ठप्प पडले आहे. आता त्याचा त्रास रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना जाणवू लागला असून चाचण्या करून घेण्याकरिता त्यांना सरकारी रुग्णालयाच्या खेपा माराव्या लागत आहेत.
रेडिओलॉजिस्टद्वारा करण्यात येणाऱ्या एमआयएम, सीटी स्कॅन, एक्स-रे यांची सेवा दोन दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांतील आणि स्वतंत्र रेडिओलॉजिस्ट केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांना सरकारी आणि पालिकेच्या रुग्णांलयांमध्ये पाठविण्यात येत असल्याचे ‘वैद्यकीय सल्लागार असोसिएशन’च्या अध्यक्ष डॉ. वीणा पंडित यांनी सांगितले.
आधीच सरकारी रुग्णालयांची परिस्थिती बिकट असून तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना तासन्तास रांगेमध्ये उभे राहावे लागते. नेहमीच सरकारी रुग्णालयांमधील गर्दी ओसंडून वाहत असते. त्यातच सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांवर खाजगी रुग्णांचा अतिरिक्त बोजा येत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णांलयांमध्ये तपासणी करून देताना दाणादाण उडत आहे.
अनेक रुग्णांनी संपाचे वातावरण पाहता तपासणीच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. रोगाची उकल होण्यासाठी या एक्स-रे, सिटी स्कॅन आणि एमआरआय करणे गरजेचे असते. मात्र यामध्येच दिरंगाई केल्यामुळे रुग्णांना याचा त्रास होऊ शकतो, अशी शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. परिणामी केईएम रुग्णालयात नेहमीच्या तपासणीपेक्षा सुमारे दहा टक्क्यांची वाढ झाली असल्याचे केईएम रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
खाजगी रुग्णालयातील रेडिओलॉजिस्ट केंद्रामधील तातडीच्या सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या उपचारात अडचण येऊ नये आणि संप रुग्णांच्या जीवावर बेतू नये यासाठी गंभीर आजार असलेल्या रुग्णांना रेडिओलॉजिस्टच्या सर्व सेवा मिळणार असल्याचे ‘महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशन’चे समन्वयक जिग्नेश ठक्कर यांनी सांगितले.