संदीप आचार्य

परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात देशभरातून रुग्ण केमोथेरपीसाठी येतात. मात्र, मुंबईत राहणे परवडत नसल्याने अनेक जण हिंदमाता पुलाखाली अथवा रुग्णालयाशेजारील मैदानात आपला आसरा शोधतात. अशा गरजू रुग्णांच्या मदतीसाठी आता मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

बेस्टच्या जुन्या बसेसचे स्वरूप बदलून रुग्णांना राहण्याची व्यवस्था करण्याबरोबर स्थानिक सामाजिक संस्था, धर्मशाळांच्या माध्यमातून राहण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय दादर पश्चिम येथील जाखादेवी मंदिराजवळील प्रसूतिगृहाच्या रिकाम्या भूखंडावर अद्ययावत धर्मशाळा उभारण्याचाही पालिकेचा मानस आहे.

टाटा कॅन्सर रुग्णालयात वर्षांकाठी ८५ हजार नवीन रुग्ण उपचारासाठी येतात. तर नियमित तपासणी आणि उपचारासाठी साडेपाच लाख रुग्ण येथे येत असतात. मात्र, मुंबईत राहण्याची सोय नसलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयाजवळ असलेल्या मैदानात किंवा हिंदमाता पुलाच्या खाली मिळेल तेथे पथारी पसरून राहतात.

येत्या दोन दिवसांत टाटा रुग्णालयातील रुग्णांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची बैठक घेऊन रुग्ण आणि नातेवाईकांच्या निवासाची उपाययोजना करू, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

धर्मशाळा आणि संस्थांना मदत देण्याची तयारी..

टाटा कॅन्सर रुग्णालयानेही परळच्या हाफकिन संस्थेत रुग्ण व नातेवाईकांसाठी धर्मशाळा उभारण्याचे काम हाती घेतले आहे. संत गाडगेबाबा संस्थेच्या सात मजली इमारतीत ५०० हून जास्त रुग्ण व नातेवाईकांची व्यवस्था केली जाते. येथे रुग्णांकडून केवळ ५० रुपये प्रतिदिन राहण्यासाठी आकारण्यात येतात. त्यात सकाळचा नाश्ता, दुपार व रात्रीचे भोजन विनामूल्य दिले जाते, असे संस्थेचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी सांगितले. तर गाडगेबाबा धर्मशाळेत आणखी परिणामकारक व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांना मदत करण्याची तयारी अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दाखवली आहे.