खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास पालिकेचा अटकाव

मुंबई : एकीकडे शहरातील करोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढायला लागल्याने खासगी रुग्णालयातील खाटांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासायला लागली आहे. दुसरीकडे पालिकेच्या मोठ्या करोना रुग्णालयात खाटा रिकाम्या आहेत. तेव्हा मुंबईबाहेरील रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करून न घेता थेट पालिकेच्या मोठ्या करोना रुग्णालयांत पाठविण्याचे फर्मान पालिकेने खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

करोनाचा संसर्ग राज्यात सर्वच ठिकाणी झपाट्याने पसरायला लागला असून रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे तेथील आरोग्यसेवा अपुरी पडत असल्याने मुंबईजवळच्या जिल्ह्यांतून रुग्ण मुंबईत उपचारासाठी येत आहेत. त्यावेळी मुंबईत रुग्णसंख्या कमी असल्याने या रुग्णांना खाटाही उपलब्ध होत होत्या. परंतु सप्टेंबरपासून मुंबईतील रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यात उच्चभ्रू वर्गातील अधिकतर रुग्ण असल्याने खासगी रुग्णालयातील खाटांची मागणी वाढली असून त्या तुलेनेत खाटाच शिल्लक नसल्याने रुग्णांना वणवण करावी लागत आहे.

मुंबईतील खासगी रुग्णालयात अधिकतर मुंबईबाहेरील करोनाबाधित रुग्ण दाखल होत आहेत. मुंबईतील लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या सप्टेंबरपासून वाढल्याने खाटा शिल्लक नसल्याने त्यांचे हाल होऊ नयेत. यासाठी मुंबईबाहेरील रुग्ण आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करू नये. पालिकेच्या मोठ्या करोना रुग्णालयात पाठवावे. तेथे त्यांना खाटा मिळण्याची सोय केली जाईल, असे आदेश पालिकेने खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

उपनगरवासीयांचा आक्षेप

रुग्णांना उपचार घेण्यासाठी अशा रीतीने पालिका आडकाठी करू शकत नाही. राज्यात रुग्णांना कोठेही उपचार घेण्याची मुभा आहे. त्यामुळे पालिकेला अशा सूचना देण्याचे अधिकार नाहीत, असे जनस्वास्थ्य अभियानाचे अविनाश कदम यांनी सांगितले. तर ‘पालिकेच्या रुग्णालयात आवश्यक सोईसुविधा नाहीत. तसेच त्यांना योग्य उपचारही मिळत नसल्याने रुग्णांचा पालिका रुग्णालयांवर विश्वाास नाही. वसई-विरार भागात करोना उपचार देणारी खासगी रुग्णालये मोजकी आहेत. त्यामुळे मुंबईतील खासगी रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय नाही,’ असे वसई रुग्णहक्क समितीचे राजेंद्र ढगे यांनी सांगितले.