जे जे रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून प्रकार

जे जे रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी दोन निवासी डॉक्टर आणि परिचारिका यांना शनिवारी सकाळी मारहाण केली असून याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी रुग्णाच्या चार नातेवाईकांना अटक करण्यात आली.

पोटाच्या विकारावर उपचारांसाठी जे जे रुग्णालयात दाखल झालेल्या ४५ वर्षीय झायदा बिबी या महिलेचा शनिवारी सकाळी शस्त्रक्रिया विभागात मृत्यू झाला. ती मुंब्रा येथील रहिवासी होती. तिच्या नातेवाईकांना याबाबत कल्पना देत असताना संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सकाळी सातच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमध्ये एक महिला व पुरुष डॉक्टरसह परिचारिकेलादेखील रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली आहे.

या घटेनेचे सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध असून यामध्ये डॉक्टरांना मारहाण करण्याबरोबरच नातेवाईकांनी रुग्णालयातील वस्तूंची तोडफोड केल्याचे दिसून येते. सरकारी कर्मचाऱ्यांवर कर्तव्य बजावत असताना हल्ला करणे आणि त्यांना कर्तव्यापासून रोखणे आदी गुन्हे दाखल करत जे जे मार्ग येथील पोलिसांनी रुग्णाचे नातेवाईक मोहम्मद अल्ताफ शेख (३२), सोनी सानाउल्लाह शाह (२३), रिहान सानाउल्लाह शाह(२२), समिला सानाउल्लाह शाह (२०) यांना अटक केली आहे.

मारहाण झालेले निवासी डॉक्टर आतिश पारिख यांना गंभीर इजा झाली असून त्यांच्या जबडय़ाचे हाड मोडले आहे. तसेच दुसऱ्या निवासी डॉ. शाल्मली धर्माधिकारी यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने गळ्याला इजा झाली असून अचानक झालेल्या या हल्ल्याने त्यांना मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमध्ये परिचारिका आणि डॉक्टरांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनाही मार लागला आहे.

या घटनेमध्ये रुग्णाकडे दुर्लक्ष झाले आहे का याची शहानिशा करण्यासाठी रुग्णाच्या सर्व वैद्यकीय अहवालांची तज्ज्ञांकडून तपासणी केली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण आणि संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले.

निवासी डॉक्टर संपावर

मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा निषेध करत संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांनी शनिवारपासून  संप पुकारला आहे. रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असून याबाबत ठोस कृती कार्यक्रम राज्य सरकारने दिल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने घेतली आहे. संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांची मार्डच्या प्रतिनिधींसोबत शनिवारी दुपारी बैठक पार पडली.