पालिका रुग्णालयात सुविधा पुरविण्याची भाजपची मागणी

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी मोठय़ा संख्येने रुग्ण येत असतात. गरीब कुटुंबातील या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती खालावलेली असते. रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी पालिकेने रुग्णांना ड्रॅगन फ्रूट, किवी अथवा पपई द्यावा. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून त्यांची प्रकृती सुधारण्यास मदत होऊ शकेल, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालिकेने केईएम, नायर, शीव ही तीन प्रमुख रुग्णालये सुरू केली आहेत. त्याचबरोबर उपनगरीय रुग्णालये, दंत रुग्णालय, दवाखाने, आरोग्य केंद्र, प्रसूतिगृहे सुरू केली आहेत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. केवळ मुंबईकरच नव्हे तर आसपासची शहरे आणि परराज्यांमधूनही रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयांमध्ये येत असतात.

उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे त्यांना फळे विकत घेऊन खाणे शक्य होत नाही. फळांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेनेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना ड्रॅगन फ्रूट, किवी आणि पपईसारखी फळे उपलब्ध करावी. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत जलदगतीने सुधारणा होऊ शकेल, असे भाजपच्या नगरसेविका सुषमा सावंत यांनी सांगितले.

पालिकेने रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या सकाळ आणि संध्याकाळच्या आहारामध्ये ड्रॅगन फ्रूट, किवी, पपईसारखी रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या पौष्टिक फळांचा समावेश करावा, अशी मागणी सुषम सावंत यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. ही ठरावाची सूचना पालिका सभागृहात मांडण्यात येणार आहे.

पालिका सभागृहाने या ठरावाच्या सूचनेला मंजुरी दिल्यानंतर ती पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी सादर करण्यात येणार आहे. पालिका आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर रुग्णांना रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतील अशी फळे देण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल.