मुंबई : औरंगाबाद येथील अठरा वर्षांचा सागर हिमोफिलियाच्या आजाराने त्रस्त आहे. या दुर्मीळ आजारावरील औषधे औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे सागरला थेट मुंबईतील केईएम रुग्णालयात यावे लागले. घरची गरिबी आणि मुंबईत राहण्याचे ठिकाणही नाही अशा अवस्थेत सागर केईएममध्ये उपचार घेत आहे. राज्यात हिमोफिलियाचे सुमारे पाच हजार रुग्ण असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांना लागणारी औषधे आरोग्य विभागाच्या रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

आता आरोग्य विभागाने औषध खरेदीचा सुमारे ३३ कोटींचा प्रस्ताव हाफकिन महामंडळाला सादर केला असून औषध उपलब्ध होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. मे महिन्यात हिमोफिलियाच्या औषधांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने तातडीची बाब म्हणून दहा कोटी रुपयांची औषध खरेदी केली होती. त्यानंतरही आणखी एकदा दहा कोटी रुपयांच्या औषधांची खरेदी करण्यात आली असली तरी राज्यातील रुग्णांची संख्या व औषधांची गरज लक्षात घेऊन वेळीच औषधे का खरेदी केली जात नाहीत, असा सवाल ‘हिमोफिलिया सोसायटी ऑफ इंडिया’चे सचिव अजय पालंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.

हिमोफिलियाच्या रुग्णांमध्ये शरीरात रक्तस्राव झाल्यास रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही. परिणामी एखाद्या रुग्णाला जखम झाल्यास रक्तस्राव होतच राहातो. अशा रुग्णांना रक्त गोठण्यासाठी फॅक्टर आठ, नऊ, सात, फिबा इंजेक्शन द्यावे लागते. ही लाइफ सेव्हिंग औषधे असून याची निविदा काढण्यासाठी हाफकिनमध्ये यापूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तथापि तांत्रिक कारणामुळे तो फेटाळला गेला. आता पुन्हा निविदा काढण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात औषधपुरवठा होण्यात किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात घेता किमान दहा कोटींच्या औषधांची तातडीने खरेदी करावी, अशी मागणी हिमोफिलिया सोसायटीने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याकडे केली आहे.

राज्यात पाच हजार बाधित

संपूर्ण देशात हिमोफिलियाचे सुमारे २० हजार रुग्ण असून त्यापैकी एकटय़ा महाराष्ट्रात पाच हजार रुग्ण आहेत. याशिवाय अन्य राज्यातही औषधाचा प्रश्न असल्यामुळे हिमोफिलियाचे तातडीचे रुग्ण महाराष्ट्रात धाव घेतात. यात गुजरात, दिल्ली व मध्य प्रदेशातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असून अशा रुग्णांना आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन औषधे दिली जातात, असे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सामान्यपणे या रुग्णांना महिन्याकाठी ३० ते ५० हजार रुपये औषधांपोटी लागतात. एकूण रुग्णांचा विचार करता किमान १८० कोटी रुपये औषधांसाठी खर्च येऊ शकतो. मात्र आरोग्य विभाग केवळ आपत्कालीन रुग्णांचा विचार करून वर्षांकाठी ३३ कोटींचीच औषध खरेदीही वेळेत करत नसल्यामुळे रुग्णांचे सध्या अतोनात हाल होत आहेत.

औषध खरेदीचा प्रस्ताव हाफकिन महामंडळाकडे असून औषध मिळण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो; तथापि रुग्णांना औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या जातील. हिमोफिलियाची आठ उपचार केंद्रे असून संपूर्ण राज्यात या रुग्णांवर उपचार व्हावे यासाठी आम्ही योजना आखत आहोत.

–  डॉ. संजीव कांबळे, आरोग्य संचालक