रुग्णसेवेसारख्या आदर्श कर्तव्याला काळिमा फासणारी घटना  भिवंडी महापालिकेच्या रुग्णालयात उघडकीस आली आहे. भिवंडीत महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांच्या नैसर्गिक विधींना कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी या रुग्णांना रुग्णवाहिकेत कोंबून दूरवर फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात एका दुर्दैवी रुग्णाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी सफाई ठेकेदार महेश शिर्के, दोन कामगार आणि रुग्णवाहिका चालक अशा चौघांना अटक केली.
बुधवारी पहाटे पोलिसांना एक मृत तरुण व एक बेशुद्धावस्थेतील तरुण गस्तीच्या वेळी दिसले. खिशातील कागदपत्रांवरून सत्येंद्र राजेश्वर पांडे (२७, मुळचा रा. मुजफ्फरपूर) या मृताची ओळख पटली. अनोळखी तरुणास कळवा येथील शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यावर त्याचे नाव बिरेन शांताकुमार वर्मा असल्याचे समजले. त्याच्या भावाची चौकशी केला असता हे कृष्णकृत्य उघडकीस आले.
सत्येंद्र आणि बिरेन यांना वारंवार नैसर्गिक विधी होत असल्याने कंटाळून या चौकडीने त्यांना साकेत परिसरात आणून फेकले. याप्रकरणी रुग्णालयातील अन्य कुणाचा सहभाग आहे का, याचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. डी. सुरवसे यांनी दिली.