महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविणाऱ्या चोरटय़ांविरोधात मोक्कापुरतीच मर्यादित कारवाई करू नका, तर वेळप्रसंगी त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी शस्त्रेही चालवा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी ठाण्यात दिले. तसेच सर्वाना दागिने घालण्याचा आणि मोकळेपणाने फिरण्याचा अधिकार असून त्यांचे व मालमत्तेचे रक्षण करण्याचे काम पोलिसांचे आहे, अशा शब्दात त्यांनी महिलांना दागिने घालू नका, असा सल्ला देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्यावतीने पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या गृहसंकुलाचे उद्घाटन तसेच चोरीतील मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमानिमित्त गृहमंत्री आर. आर. पाटील ठाण्यात आले होते. सोनसाखळी चोरीमध्ये महिला जखमी होतात, तसेच त्यांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी प्रसंगी बळाचा तसेच शस्त्राचा वापर करावा, अशा सुचना देत यासंदर्भात आपण मानवी हक्क आयोग आणि इतर गोष्टींचा अभ्यास केला आहे, असेही त्यांनी सांगितले. काही गुंड राजकारणात नशीब आजमवित असल्याने चुकीचे लोक निवडून येत आहेत, त्यामुळे त्यांना बेडय़ा घालण्याऐवजी पोलिसांना सलाम ठोकावा लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. शहराचे विस्तारीकरण होत असताना, शाळा, आरोग्य तसेच इतर मुलभूत गोष्टींचा विचार केला जातो. मात्र, नियोजन प्राधिकरणाकडून जनतेच्या जिवताचे व मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचा विचार केला जात नाही, अशी खंत व्यक्त करत लोकसंख्येनुसार, पोलीस ठाणे, पोलिसांकरीता घरे, याचाही विचार नियोजन प्राधिकरणाने केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये सी सी टिव्ही कॅमेरे बसविण्याचा कार्यादेश निघाला आहे, त्याचप्रमाणे ठाणे, पुणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, आदी भागात शासनामार्फत सी सी टिव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. हैदराबाद मधील बॉम्बस्फोटासंदर्भात काही माहिती मिळाल्यास एसटीएसकडून ती देण्यात येईल तसेच त्यांना हवी ती मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टिकेला उत्तर देणे, उचीत नाही आणि आमच्या पक्षाची तशी संस्कृती नाही, असे सांगत त्यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टिकेची दखल घेतली नाही. या कार्यक्रमप्रंसगी पालकमंत्री गणेश नाईक, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे संचालक प्रवीण दिक्षित, ठाणे पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि नागरीक उपस्थित होते.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना घराच्या चाव्या..
ठाणे येथील खारकर आळीमध्ये असलेली पोलिसांची चाळ स्वरूपातील वसाहत पाडून त्या ठिकाणी पाच १३ मजली इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चार इमारती कर्मचाऱ्यांसाठी तर एक इमारत अधिकाऱ्यांसाठी आहे. या इमारतीमध्ये सुमारे सहाशे ते ६५० चौरसफुटांची २६० घरे असून ती अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त आहेत. पोलिस आधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना या घरांच्या चावीचे वाटप गृहमंत्री पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. तसेच चोरटय़ांकडून जप्त केलेले सोन्याचे दागिने सुमारे २८८ तक्रारदारांनाही यावेळी परत करण्यात आले.
दोन्ही गटाने एकत्र यावे..
नाटय़ परिषद या संस्थेची जास्त बदनामी होऊ नये, यासाठी दोन्ही गटांनी एकत्र बसून चर्चा करण्याची गरज आहे, असा सल्ला देत दोन्ही गटांनी गैर व्यवहार झाल्याची तक्रार केली असून त्याचा तपास केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.