‘देव पहाया करणे’ या ‘लोकसत्ता’तील अग्रलेखावर आपले मत मांडणारा लातुरच्या ‘एमआयडीएसआर दंत महाविद्यालया’चा पवन शिंदे ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षीसाचा मानकरी ठरला आहे. तर नाशिकच्या ‘एच.पी.टी. आर्ट्स अ‍ॅण्ड आर. वाय. के. सायन्स कॉलेज’ची काजल बोरास्ते हिने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.
महिलांच्या मंदिर प्रवेशावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करणारा हा अग्रलेख १४ एप्रिलला प्रकाशित झाला होता. त्यावर पवन आणि काजल हिने केलेले भाष्य परीक्षकांना विशेष भावले. पवनला सात हजार आणि प्रमाणपत्र तर काजलला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.
महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षीसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरूणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते.