पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने कोल्डमिक्सचे परदेशी तंत्रज्ञान आयात केले, मात्र तरीही अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी वादग्रस्त ठरलेल्या पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात असल्याचे आढळून येत आहे. मुंबई महापालिकेने यंदा पावसाळ्यापूर्वीच ९२७ मेट्रिक टन कोल्डमिक्स पालिकेच्या २४ वॉर्डात वितरित केले होते. गेल्या वर्षी जेवढे कोल्डमिक्स वापरले गेले त्यापेक्षा अधिक कोल्डमिक्स या वर्षी तयार करण्यात आले होते. मात्र तरीही पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजवण्याची वेळ का येते, असा सवाल निर्माण झाला आहे.

मुंबई महापालिकेने दोन वर्षांपूर्वी परदेशातून कोल्डमिक्स आयात केले होते. भर पावसातही कोल्डमिक्समुळे खड्डे बुजवता येत असल्यामुळे पालिकेने २०१८ मध्ये कोल्डमिक्सचे तंत्रज्ञान आयात केले. गेल्या वर्षी पालिकेने वरळीच्या कारखान्यात तयार केलेले कोल्डमिक्स पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी वापरले. गेल्या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात ८८० मेट्रिक टन कोल्डमिक्स वापरण्यात आले होते. त्या अनुभवानंतर या वर्षी पालिकेने १०३६ मेट्रिक टन कोल्डमिक्स पावसाळ्यापूर्वी तयार केले होते. त्यापैकी ९२७ मेट्रिक टन कोल्डमिक्स वितरित करण्यात आले होते. मात्र तरीही अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोल्डमिक्स गेले कुठे? की कोल्ड मिक्स नापास झाले? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. घाटकोपरमध्ये मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेचे कोल्डमिक्स गेले कुठे, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.

घाटकोपरच्या गोळीबार रोड येथे रस्त्यावर पडलेले खड्डे पेव्हर ब्लॉकचा वापर करून बुजविण्यात आल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी केल्या आहेत. घाटकोपर पश्चिमेकडील मेट्रो रेल्वे स्टेशनच्या खालील भागात बाटा शोरूमच्या समोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असून ते पेव्हर ब्लॉकचा वापर करून बुजविण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

नगरसेवकांचा हॉटमिक्सचा आग्रह

खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स व हॉटमिक्सचा वापर पालिका करते. त्यापैकी कोल्डमिक्स हे भर पावसातही खड्डे बुजवत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र हे कोल्डमिक्स पावसामुळे निघून जात असल्याचा नगरसेवकांचा दावा आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स याऐवजी हॉटमिक्स मटेरियलचा वापर करण्याची जोरदार मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीत केली होती.