पक्षाध्यक्ष शरद पवार, अजितदादा पवार व राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांवर केलेल्या आरोपांमुळे राम पंडागळे यांची आमदारकी पणाला लागणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. पक्षाकडून सर्व मानमरातब मिळाल्यानंतरही पदाच्या लालसेतून पक्षाध्यक्षांवरच आरोप करणाऱ्या आमदार पंडागळे यांच्या विरोधात पक्षातील वातावरण तापले असून पंडागळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार व त्यांची आमदारकीही धोक्यात येणार असे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेऊन दुसऱ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांला दिल्याने संतापलेले आमदार राम पंडांगळे यांनी मंगळवारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार व गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावरच हल्लाबोल केला. अजित पवारांनी शेतक ऱ्यांची जमीन भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना दिली, तर शरद पवार भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश मागासवर्गीय विभागाचे दहा-बारा वर्षे पंडांगळे अध्यक्ष होते, त्यांना विधान परिषदेचे आमदार करण्यात आले, सत्तेचा उपभोग घेऊन राजकीय ताकद देणाऱ्या पक्षावरच उलटणारे पंडांगळे अनाठायी आरोप करीत आहेत, अशी प्रतिक्रिया पंडाळे यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच प्रदेश राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली.
आज उत्तर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पंडागळे यांच्या पुतळ्याची गाढवावरून िधड काढून त्यांचा निषेध केला. अनेक पदे उपभोगूनही पक्षनेत्यांवरच आरोप करणाऱ्या पंडागळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी सुर्वे यांनी केली. गेल्या सहासात महिन्यांपासून रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच नागपूरमधील आरपीआयचे नगरसेवक प्रकाश गजभिये राष्ट्रवादीत आले, त्यांना प्रदेश मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष केल्याने पंडांगळे व त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत.
राष्ट्रवादी पक्ष म्हणजे भ्रष्टाचाराची टोळी आहे, असा हल्लाबोल पंडागळे यांनी केला. दलितांवरील अत्याचाराला फारसे महत्त्व न देणारे गृहमंत्री आर.आर.पाटील सवर्णावरील अत्याचाराच्या बातमीने अस्वस्थ होतात, अशी वर्मावर घाव घालणारी टीकाही त्यांनी केली.