‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग या म्हणीप्रमाणे काही जणांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना शनिवारी अप्रत्यक्ष टोला लगावला. मुंबईत झालेल्या सर्वभाषक मेळाव्यात बोलताना मुंबईत राहणाऱ्या सर्व भाषिकांच्या संरक्षणाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस घेईल, अशी ग्वाही देत अमराठी मतांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते विजय कांबळे यांनी वांद्रे येथे सर्व भाषक कामगारांचा मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात पवार यांच्यासह राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव तसेच जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी मोदींचे नाव न घेता टोलेबाजी केली. ‘मराठीत एक म्हण आहे.. उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग. त्याप्रमाणे काही जणांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत,’ असे ते म्हणाले. सत्ता संपादनासाठी धर्म, जात आणि भाषा यांचा आधार घेण्याची वृत्ती बळावल्याबद्दल पवार यांनी चिंता व्यक्त केली. निधर्मवादाची कास असणाऱ्यांनी जातीय शक्तींचा पाडाव करण्याकरिता संघटित व्हावे, असे आवाहनही पवार यांनी केले.
उत्तर प्रदेशमधील मुझ्झफरनगर येथे झालेल्या जातीय दंगलीचा पवार यांनी उल्लेख केला. ‘‘मुझ्झफरनगरची पाश्र्वभूमी कधीच धार्मिक संघर्षांची नाही. तरीही तेथील वातावरण बिघडविण्यात आले. देशात कोठेही संकट उद्भवल्यास महाराष्ट्र नेहमीच पाठीशी उभा राहिला. आताही दंगलग्रस्त मुझ्झफरनगरवासीयांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभा राहील आणि महाराष्ट्रातून मदत पाठविली जाईल,’’ असे ते म्हणाले.
मेळाव्याचे आयोजक विजय कांबळे आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार संजय दिना पाटील यांनी अमराठी भाषिकांच्या मुद्दय़ाला स्पर्श करीत मुंबईत राहणाऱ्या सर्व भाषिकांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी पुढाकार घेईल, असे जाहीर केले. मात्र, शरद पवार यांनी सर्व भाषकांचा मेळावा असला तरी मनसे किंवा राज ठाकरे यांच्यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे टीका करण्याचे टाळले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2013 5:20 am