26 September 2020

News Flash

नीरेच्या पाण्यावरून उदयनराजे-रामराजे वाद पेटला, पवारांची मध्यस्थी अपयशी

उदयनराजे भोसले चिडून बैठकीत बाहेर पडल्याने त्यांच्यातील वादावर तोडगा निघू शकला नाही.

नीरेच्या पाण्यावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून हा वाद शमावा यासाठी शरद पवारांनी शनिवारी बोलावलेली बैठकही निष्फळ ठरली आहे. उदयनराजे हे चिडून बैठकीत बाहेर पडल्याने त्यांच्यातील वादावर तोडगा निघू शकला नाही.

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापलेले असताना उदयनराजे भोसले यांनी १४ वर्षे बारामती-इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून रामराजे नाईक निबाळकरांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या टीकेला उत्तर देताना रामराजेंनी उदयनराजेंवर खालच्या पातळीवरील टीका केली होती. स्वयंघोषीत छत्रपती, चक्रम असे शब्दप्रयोग त्यांनी उदयनराजेंबाबत काढले होते. तसेच पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे उदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू असा इशारा दिला होता. दरम्यान, उदयनराजेंवरील टीका सहन न झाल्याने त्यांच्या समर्थकांनी शनिवारी साताऱ्यात रामराजेंचा पुतळाही जाळला. त्यामुळे हा वाद अधिक विकोपाला जाऊ नये यासाठी शरद पवारांनी मुंबईत शनिवारी दुपारी या दोन्ही नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते.

मात्र, बैठक सुरु झाल्यानंतर काही वेळातच चिडलेले उदयनराजे बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट पत्रकारांशी बोलताना आपली भुमिका मांडली. ते म्हणाले, ‘रामराजेंनी माझ्यावर स्वयंघोषीत छत्रपती अशी टीका केली. मी स्वयंघोषीत छत्रपती नाही लोकांनी त्यांच्या मनात मला ते स्थान दिले आहे. छत्रपतींच्या घराण्याचा मी कधीही वैयक्तीक स्वार्थासाठी वापर केला नाही. रामराजेंनी मला चक्रमही म्हटलं, हो मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय होत असेल तर मी चक्रम होतो. मला अन्याय सहन होत नाही त्यामुळे मी स्वपक्षीयांवरही बोलतो त्याला घरचा आहेरही म्हटलं जातं.’

‘तुम्ही सभापती आहात ना तर तसे वागा असा सल्ला देताना तुम्हाला कोणाशी काय बोलायचंय ते बोलून घ्या, पुढचं नंतर बघू’ असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. दरम्यान, रामराजेंचा उल्लेख पिसाळलेलं कुत्रं असा करीत, बरं झालं मी बैठकीतून बाहेर पडलो अन्यथा हे कुत्रं मलाही चावलं असतं, अशा खालच्या शब्दांत उदयनराजेंनी रामराजेंवर हल्लाबोल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 3:11 pm

Web Title: pawars mediation fails between udayan raje ramraje debate aau 85
Next Stories
1 Video : शिक्षणमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे
2 खांदेश्वरमध्ये डंपरचालकाच्या हलगर्जीपणामुळे सायन पनवेल महामार्गावर विचित्र अपघात
3 वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी कापला ५१ किलोंचा ‘ईव्हीएम’ केक
Just Now!
X