गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करणाऱ्या मुंबईकरांकडून दामदुपटीने पाणीपट्टी वसूल करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत घेण्यात आला. अतिरिक्त पाणी वापरणाऱ्यांकडून यापुढे तिप्पट, चौपट आणि पाचपट पाणीपट्टी वसूल करण्यात येणार आहे. पाणी बचतीबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या मुंबईकरांना आर्थिक फटका बसणार असला तरी यामुळे पालिकेच्या तिजोरीत ६५ कोटी रुपये महसूल जमा होईल, असा अंदाज आहे. तसेच नागरिकांना पाणी बचतीची सवय लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. हे नवे दर १ एप्रिलपासून लागू होतील.
राष्ट्रीय निकषांनुसार मुंबईत प्रतिमाणशी १५० लिटर्स पाण्याचा वापर करता येतो. मात्र मुंबईमध्ये बेसुमार वापर होतो. त्यामुळे १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापरणाऱ्यांकडून दुप्पट, तिप्पट आणि चौपट दराची आकारणी करून पाणीपट्टी वसूल केली जाते. मात्र आता अतिरिक्त पाण्याचा वापर करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी तिप्पट, चौपट आणि पाचपट पाणीपट्टी वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्रतिमाणशी २०० लिटर्सपेक्षा अधिक पाण्याचा वापर करणाऱ्यांकडून तीन ते पाचपट पाणीपट्टी वसूल करण्यात येणार आहे.
सध्या अन्य बांधकामांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे दर प्रतीचौरस मीटर ४७५ रुपयांवरून थेट प्रतीचौरस मीटर ५१३ रुपये करण्यात आला आहे. रस्त्यात खोदकाम करताना जलवाहिनी अथवा मलनिस्सारण वाहिनीचे नुकसान करणाऱ्या कंपनीकडून ४०० टक्के दंड आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला. मलनिस्सारण शुल्कात १० टक्के कपात करावी, या भाजप गटनेते मनोज कोटक यांच्या उपसूचनेसह पाणीपट्टीचा प्रस्ताव मंजूर झाला.

बाजारामध्ये शीतपेय आणि बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्यांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे दरही वाढविण्यात आले आहेत.
सध्या या कंपन्यांना ६४ रुपये ८० पैसे प्रतिहजार दराने पाणीपुरवठा केला जातो.

मात्र या पुढे एक हजार लिटर पाण्यासाठी या कंपन्यांना ९७ रुपये २० पैसे मोजावे लागणार आहेत. परिणामी शीतपेय आणि बाटलीबंद पाण्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.
बाटलीबंद पाण्याने आपली तृष्णा भागविणाऱ्या मुंबईकरांना थेट याचा फटका बसणार आहे.

सध्या निवासी बांधकामासाठी ३०० रुपये प्रतीचौरस मीटर दराने पाणी पुरविले जाते. यापुढे ३२४ रुपये प्रतीचौरस मीटर दराने पाणी देण्यात येणार आहे.