राज्य सरकारने लागू केलेल्या स्थानिक संस्था कर भरण्यात असहकार्य करणाऱ्या ठाण्यातील व्यापाऱ्यांनी अखेर महापालिकेपुढे नमते घेत, कर भरणा करण्याची तयारी दर्शविली आहे. पण, त्यासाठी त्यांनी महापालिकेकडे महिनाभराची मुदत मागितली असून त्यास महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी मान्यता दिली आहे. तसेच महिनाभरात २१० कोटी रुपये कर भरणा करा, अन्यथा कर सवलत मागे घ्यावी लागेल, असा इशारा गुप्ता यांनी दिला आहे.
व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना २१० कोटी रुपयांचा कर भरणा जुलै महिन्यापर्यंत करण्यास पालिकेने मुदत दिली होती़. पण, कर भरणा करण्यासाठी कमी कालावधी मिळाल्याने व्यापाऱ्यांनी आणखी एक महिन्यांची मुदत वाढवून मागितली होती. त्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती ठाणे व्यापारी महासंघाचे सचिव भावेश मारू यांनी दिली.
स्थानिक संस्था करापोटी महापालिकेला ६३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असून व्यापाऱ्यांनीही आता पैसे भरण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्यांना आणखी एक महिन्यांची म्हणजेच २० ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार, स्थानिक संस्था करातील दर दोन टक्के करण्यात आले आहेत. त्यामध्ये मद्य, तंबाखू, आदींना वगळण्यात आले आहे. यासंबंधी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. पण, त्यासाठी व्यापाऱ्यांना येत्या महिनाभरात २१० कोटी रुपयांचा कर भरणा करावा लागणार आहे. तसे झाले नाही तर या प्रस्तावावर पुनर्विचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुमारे सहा हजार व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ६१.४९ कोटी रुपयांचा कर भरणा केला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच डॉक्टर, वकील, सी.ए आदींशीही याबाबत लवकरच बैठका होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.