रेल्वेत गर्दुल्ल्याच्या हल्ल्यापासून बचावलेल्या पायलला भरत जाधव, तेजश्रीकडूनही धीर

मस्जिद बंदर येथे गर्दुल्ल्याच्या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करताना चालत्या रेल्वेतून उडी मारणाऱ्या पायल कांबळे या तरुणीच्या हिमतीला दाद देऊन तिला दिलासा देण्यासाठी रेल्वे अपघातातच दोन्ही हात गमवावे लागणाऱ्या मोनिका मोरे हिने भेट घेतली.

पायल हिच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालायत उपचार सुरू आहेत. या अपघातात तिच्या पायाला जबर दुखापत झाली. मोनिका आणि तेजश्री या दोघींनी पायलला भेटून तिच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. सेंट जॉर्ज रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून पायल उपचार घेत आहे. पायल क्लासकरिता निघाली होती. परंतु, एक गर्दुल्ला ती प्रवास करत असलेल्या महिलांच्या डब्यात शिरला आणि तिच्याशी लगट करू लागला. घाबरून तिने चालत्या गाडीतून उडी मारली. स्वत:वर गुदरलेल्या प्रसंगामुळे १३ वर्षांच्या पायलला गंभीर शारीरिक इजांबरोबरच जबर मानसिक धक्का बसला होता. या धक्क्य़ातून सावरण्यासाठी पायलला तेजश्री व मोनिकाची मदत मिळाली.

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी पुढाकार घेऊन या तिघींची भेट घडवून आणली. साडे तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे रेल्वे अपघातात मोनिकाला दोन्ही हात गमवावे लागले होते. या अपघातामुळे मोनिकाला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. अशा वेळी अभिनेता भरत जाधव यांनी चित्रीकरणातून वेळ काढून मोनिकाशी संवाद साधला व तिला धीर दिला.

अभिनेता भरत जाधव यांनी माझी विचारपूस केली याचा खूप आनंद झाला, असे मोनिका सांगते. अशाच प्रकारे पायलला तिच्या आयुष्यातील संकटाशी दोन हात करण्याचे बळ मिळावे यासाठी मी तिची भेट घेतली, असे मोनिकाने सांगितले. यावेळी तेजश्री प्रधान यांनी हलक्याफुलक्या विनोदातून पायलच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला.

त्याशिवाय झालेल्या अपघातातून बळ घेऊन जिद्दीने उभे राहण्याचा सल्ला दिला. अशा अपघातात विविध सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र मनावर झालेला आघात कमी करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहनाची आवश्यकता असते. अशा प्रकारच्या छोटय़ा कार्यक्रमातून रुग्णांचे मनोबल वाढविण्यास मदत मिळते. म्हणून या तिघींची भेट घडवून आणण्याकरिता पुढाकार घेतल्याचे मुळ्ये यांनी सांगितले. यावेळी अभिनेत्री तेजश्री प्रधानदेखील आवर्जून उपस्थित होती.