मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या तीन महिला डॉक्टरांवर पोलिसांनी पुरावे नष्ट केल्याचा आरोपही ठेवण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकिलांनी गुरुवारी दिली.

डॉ. पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रमुख आरोपाप्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर यांना अटक करण्यात आली आहे. या तिघींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल आहे. तिघींनीही जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर या तिघींच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी डॉ. तडवी यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती का? अशी विचारणा त्यांनी केली. त्याला थेट उत्तर देण्याऐवजी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी आरोपींवर पुरावे नष्ट करण्याचा आरोप ठेवण्यात आल्याचे सांगितले. त्याच वेळी न्यायवैद्यक पुराव्यांचा पूर्ण अहवाल अद्याप यायचा असून दोन आठवडय़ांत प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

‘लोकसत्ता’ला गुन्हे शाखेतील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पायल यांच्या मोबाइलची तपासणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत करण्यात आली. या तपासणीत मोबाइलमधून काढून टाकण्यात आलेले एक छायाचित्र पायल यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचे आहे. मात्र पोलिसांना त्यांच्या खोलीत कुठेही चिठ्ठी सापडली नव्हती. या प्रकरणाला महिना उलटल्यानंतरही आरोपींबाबत पोलिसांनी भारतीय आणि महाराष्ट्र वैद्यक परिषदेला काहीच कळवले नसल्याबाबत न्यायालयाने पोलिसांना फटकारले.

हस्ताक्षराची तपासणी सुरू

डॉ. पायल यांच्या मोबाइलमध्ये सापडलेली चिठ्ठी त्यांनीच लिहिली का? हे स्पष्ट करण्यासाठी गुन्हे शाखा हस्ताक्षर तपासणार आहेत. पोलिसांनी तडवी कुटुंबाकडून पायल यांची स्वाक्षरी, हस्तलिखित कागदपत्रांची मागणी केली आहे.