14 July 2020

News Flash

आरोपी डॉक्टरांना नायर रुग्णालयातूनच उर्वरित शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी?

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; उच्च न्यायालयात आज निर्णय

डॉ. पायल तडवी (संग्रहित छायाचित्र)

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; उच्च न्यायालयात आज निर्णय

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिला डॉक्टरांना नायर रुग्णालयातूनच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे उर्वरित शिक्षण पूर्ण करू देण्याची परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय उच्च न्यायालय शुक्रवारी देणार आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य माहीत असले तरी कुणाला शिक्षण घेण्यापासून रोखणे योग्य होणार नाही, असे न्यायालयाने गुरुवारच्या सुनावणीत स्पष्ट केले. तसेच आरोपींना अन्य विभागांतून उर्वरित शिक्षण पूर्ण करणे शक्य आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांना शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

डॉ. तडवी यांनी गेल्या वर्षी मेअखेरीस नायर रुग्णालयातील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींनी जातीवरून छळ केल्यानेच आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे डॉ. तडवी यांनी आत्महत्येपूर्वी भ्रमणध्वनीवर लिहून ठेवलेल्या मजकुरात नमूद केले होते. गेल्या ऑगस्ट महिन्यात या तिघींना जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना नायर रुग्णालयात प्रवेश करण्यापासून मज्जाव केला होता. याशिवाय खटला पूर्ण होईपर्यंत या तिघींचा वैद्यकीय अधिकारी म्हणून मिळालेला परवानाही निलंबित केला होता.

आपल्याला पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांचे शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि ते नायर रुग्णालयातूनच पूर्ण करू द्यावे, अशी मागणी तिघींना पुन्हा उच्च न्यायालयात केली आहे. तसेच जामीन मंजूर करताना रुग्णालयात प्रवेशाबाबत घातलेली अट शिथिल करण्याची मागणी केली आहे.

‘कुणालाही शिक्षणापासून रोखणे अयोग्य’

प्रकरणाचे गांभीर्य आपल्याला माहीत असले तरी कुणाला शिक्षण घेण्यापासून रोखणे योग्य होणार नाही, असे न्यायालयाने म्हटले.या प्रकरणाचा समाजावर खोलवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आरोपी पुन्हा रुग्णालयात परतल्यास त्यांचे कुणी आनंदाने स्वागत करणार नाही. त्यांना कर्मचारी वर्गाकडून प्रतिक्रिया मिळणार. म्हणूनच आरोपींवरही छळवणुकीची वेळ येऊ नये, असे आम्हाला म्हणायचे असल्याचे न्यायालयाने म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 12:07 am

Web Title: payal tadvi suicide case bombay hc to decide whether accused doctors allowed to complete education zws 70
Next Stories
1 बारावीतही नापास शेरा पुसणार
2 शब्दांच्या आकाशात, शब्दांचे मेघ फिरावे..
3 सिंहगड एक्स्प्रेसमध्ये चढताना तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू
Just Now!
X