‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ कार्यक्रमात डॉ. राणी बंग यांची स्पष्टोक्ती

‘अयोग्य ठिकाणी शांत राहणे हे एक प्रकारचे प्रदूषणच आहे. शांततेचे प्रदूषण हेच आजच्या अनेक समस्यांचे मूळ आहे. अशा सोयीस्कर शांत राहण्याच्या भूमिकेने प्रश्न सुटणार नाहीत,’ असे परखड मत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी मंगळवारी व्यक्त केले.

‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ या दानयज्ञाच्या सांगता सोहळ्यात डॉ. बंग बोलत होत्या. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या दहा संस्थांची ओळख वाचकांना करून दिली जाते. या संस्थांना अर्थसाह्य़ करण्याची आणि त्या कार्यास पाठबळ देण्याची संधीही वाचकांना लाभते. यंदाही समाजातील वंचित, उपेक्षितांकरिता कार्य करणाऱ्या या संस्थांना ‘लोकसत्ता’च्या दानशूर वाचकांनी भरभरून मदत केली. वाचकांनी दिलेल्या या देणग्यांचे धनादेश डॉ. बंग यांच्या हस्ते संस्थांच्या प्रतिनिधींना देण्यात आले.

‘लोकसत्ता’च्या कार्यकारी प्रकाशक वैदेही ठकार यांनी डॉ. बंग यांचे स्वागत केले तर संपादक गिरीश कुबेर यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. कुबेर म्हणाले, ‘कार्यकर्ते, कार्य करणाऱ्या संस्था आणि दानशूर यांना जोडणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. काहीसे नकारात्मक वाटावे, अशा वातावरणात सगळेच काही वाईट नाही ही जाणीव करून देण्याचा, चांगुलपणावरील विश्वास दृढ करण्याचा, हा प्रयत्न आहे.’

उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. बंग म्हणाल्या, ‘आपल्याकडे परोपकारामागील मानसिकता थोडी वेगळी आहे. मंदिर, गोशाळा असे धार्मिक अधिष्ठान असेल तर भरभरून मदत मिळते. कारण वैयक्तिक मोक्ष हा महत्त्वाचा भाग मानण्यात येतो. मात्र, आता त्या पलीकडे जाऊन सामाजिक कामाचे पुण्य मिळवण्याची नवी संस्कृती रुजते आहे.’ आर्थिक सहकार्याबरोबरच प्रत्यक्ष कार्य करणाऱ्यांची गरज आहे, हे अधोरेखित करत ‘प्रश्न अनंत आहेत. त्याला उत्तरेही अनंत हवीत. समाजकार्यात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्या,’ असे आवाहन डॉ. बंग यांनी केले.

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे. यंदाही दानशूरांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला असून संस्थांना दोन कोटी १४ लाख रुपयांची देणगी वाचकांनी दिली आहे. विशेष मुलांच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेली ‘सोबती पालक संघटना’, काश्मीरमधील हिंसाचारात अनाथ झालेल्या चिमुकल्यांसाठी काम करणारे ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी भिडणारे यवतमाळचे ‘दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ’, वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे बार्शीचे ‘स्नेहग्राम’, भारतीय संगीताचा स्वरवारसा जपणारे सोलापूरचे ‘श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय’, नवीन पिढीवर विज्ञान संस्कार घडवणारे कुडाळचे ‘वसुंधरा विज्ञान केंद्र’, जखमी प्राण्यांसाठी झटणाऱ्या सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे यांचा ‘सर्पराज्ञी प्रकल्प’, अपंगांच्या पुनर्वसनाचे काम करणारी कोल्हापूरची ‘हेल्पर्स ऑफ हॅण्डिकॅप्ड’ ही संस्था, गतिमंद मुलांचे शिक्षण आणि रोजगार तसेच अशा मुलांच्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांची फळी उभारणारी वाईची ‘रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटयमूट’ आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक घडणीत मोठे योगदान दिलेली पुण्याची ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ या संस्थांना देणगीचे धनादेश देण्यात आले. संस्थांच्या या कार्याने आणि दानशूरांच्या प्रोत्साहनाने प्रेरणादायी ठरलेल्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहायक संपादक दिनेश गुणे यांनी केले.

कित्ता गिरवावा..

‘सामाजिक काम आणि देणगीदारांना जोडणाऱ्या ‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम खऱ्या अर्थाने लोकशाहीला बळकटी देणारा, निधीचे विकेंद्रीकरण करणारा उपक्रम आहे. इतर माध्यमांनीही मोठे सोहळे आयोजित करून पाठ थोपटून घेण्यापलीकडे जाऊन असे उपक्रम आयोजित करण्यात पुढाकार घ्यावा,’ अशा शब्दांत डॉ. राणी बंग यांनी उपक्रमाला गौरवले.

मी दरवर्षी ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाला सहकार्य करते. या वर्षी प्रथमच कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचाही योग आला. मुद्दाम लवकर येऊन सर्व संस्थांच्या कार्यकर्त्यांना भेटले. त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. ‘लोकसत्ता’ करीत असलेले हे कार्य अतुलनीय आहे. समाजात जे चांगले कार्य घडत आहे ते तुमच्यामुळे जनतेपर्यंत पोहोचत आहे.

– सुनीता पाध्ये, बोरिवली

मी गेल्या आठ वर्षांपासून या कार्यक्रमाला येत आहे. शक्य तेवढी मदत मी या उपक्रमाला करते. हा उपक्रम सर्वार्थाने समृद्ध करतो. सामाजिक संस्थांचे दीर्घ कार्य जाणून घेता, कार्य करणाऱ्यांना भेटण्याची संधी मिळते. ‘लोकसत्ता’ने असे उपक्रम करीत राहावे. त्यामुळे समाजात सकारात्मकता येईल. ‘लोकसत्ता’चा ‘नवदुर्गा’ हा उपक्रमसुद्धा मला तेवढाच महत्त्वाचा वाटतो.

– नीता आजगावकर, माहीम

‘सर्वकार्येषु सर्वदा’ दानयज्ञाच्या सांगता कार्यक्रमाने मला नि:शब्द करून टाकले. प्रत्येक संस्थेच्या कार्याने अक्षरश: भारावून गेलो आहे. ‘लोकसत्ता’मुळे हे सर्व समजून घेण्याची संधी मिळाली, याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार!

– आबाजी नाईक, लोअर परळ

गणेशोत्सवाच्या काळात प्रसिद्ध झालेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’मधून या संस्थांची माहिती मिळाली होती. त्यांना प्रत्यक्ष भेटता येईल, त्यांचे कार्य अधिक समजून घेता येईल म्हणून कार्यक्रमाला आलो. एरवी अनेक कार्यक्रमांना जातो. परंतु, असा चांगला कार्यक्रम अनुभवण्यासाठी आलो आणि खऱ्या अर्थाने समृद्ध झालो.

– संजय ढमढेरे, ठाणे</p>