पेडर रोडवर राहणारे ‘सेलिब्रिटी’ व उच्चभ्रू यांच्या विरोधामुळे पर्यावरण परवानगीच्या कचाटय़ात अडकलेल्या पेडर रोड उड्डाणपुलाचा खर्च सुमारे शंभर ते दीडशे कोटी रुपयांनी वाढेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुंबई परिसरात आजवर झालेल्या शेकडो बांधकामांच्या परिसरातील सर्वसामान्य जनतेला न मिळालेल्या अनेक सुविधा या उच्चभ्रूंना मिळणार आहेत. हा पूल बांधला जात असताना हवा शुद्ध ठेवण्यासाठी ऑक्सिजन सोडण्याच्या यंत्रणेचाही त्यामध्ये समावेश आहे.
दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी हाजीअली चौकापासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत ४.२ किलोमीटर लांबीचा पेडर रोड उड्डाणपूल बांधण्याचा ‘एमएसआरडीसी’चा प्रकल्प गेल्या दशकभरापासून रेंगाळला आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर व आशा भोसले यांनीही या उड्डाणपुलास विरोध केला होता. या पुलासंदर्भात काही काळापूर्वी ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांची केंद्रीय पर्यावरण व वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक झाली. त्यात त्यास हिरवा कंदील दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या बैठकीचे इतिवृत्त आता प्रसिद्ध झाले आहे. मात्र, पर्यावरण परवानगीचा खलिता अजूनही प्रलंबित आहे.
या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळावा यासाठी महामंडळाने ध्वनिरोधक यंत्रणा बसविणे आदी काही आश्वासने दिली होती. पर्यावरण मंत्रालयाच्या समितीने त्यांचा अटी व शर्तीत समावेश केला आहे. याशिवाय धूळ बसविण्यासाठी पाण्याचे फवारे मारणे, ऑक्सिजन सोडणारी यंत्रणा बसविणे अशा अन्यही अटी बांधकामासाठी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे.

अशा अटी, अशा शर्ती..
* उड्डाणपुलावर ध्वनिरोधक यंत्रणा
* रात्रीच्या वेळी काम बंद
* धूळ बसवण्यासाठी पाण्याचे फवारे
* खास यंत्रणेद्वारे ऑक्सिजन सोडणे

खर्च वाढणार
तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा खर्च २०० कोटी रुपये अपेक्षित होता. मधल्या
काळात तो ३२० कोटींपर्यंत गेला. आता प्रत्यक्ष पर्यावरण परवानगी मिळून काम सुरू होईपर्यंत व ते संपेपर्यंत आणखी बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च सुमारे शंभर ते दीडशे कोटींनी वाढणार असून तो ४०० ते ४५० कोटी रुपयांपर्यंत जाईल, ‘एमएसआरडीसी’ सूत्रांचा अंदाज आहे.